दुसरी कसोटी : पहिल्या दिवसाखेर भारताच्या ४ बाद २२१ धावा; मयांक अग्रवालचे दमदार शतक!


मुंबई – मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. मुंबईत जोरदार पाऊस झाल्यामुळे खेळपट्टी ओली झाली होती. त्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय भारताने घेतला. भारताचा सलामीवीर मयांक अग्रवालने दमदार शतक ठोकत भारताचा डाव सावरला आहे. भारताने मयांकच्या शतकामुळे पहिल्या दिवसअखेर ४ बाद २२१ धावा केल्या. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने विराट कोहली, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांना तंबूत धाडत भारताचे कंबरडे मोडले. केन विल्यमसनऐवजी टॉम लॅथमकडे न्यूझीलंडची कमान सोपवण्यात आली आहे. दुखापतीमुळे या कसोटीतून विल्यमसन बाहेर पडला आहे.

भारताचे सलामीवीर शुबमन गिल आणि मयांक अग्रवाल यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८० धावा केल्या. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने गिलला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. गिलने ७ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावा केल्या. त्यानंतर चहापानापर्यंत भारताला अजून दोन धक्के बसले. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि कप्तान विराट कोहली यांना एजाजनेच शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर आणि मयांकने किल्ला लढवला. या दोघांनी संघाला दीडशे धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दरम्यान मयांकने आपले अर्धशतकही पूर्ण केले.

पुन्हा गोलंदाजीला येत एजाजने ही भागीदारी मोडली. त्याने श्रेयसला (१८) यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर मयांकने वृद्धिमान साहाला सोबत घेत धावसंख्या वाढवली. दिवसाच्या शेवटच्या सत्रात मयांकने आपले शतक पूर्ण केले. मयांक-साहाने अर्धशतकी भागीदारी रचक संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली. पहिल्या दिवसअखेर भारताने ७० षटकात ४ बाद २२१ धावा केल्या. मयांक १४ चौकार आणि ४ षटकारांसह १२० तर वृद्धिमान साहा २५ धावांवर नाबाद आहे.