आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे 10 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या आखणीसाठीच आजची बैठक बोलवण्यात आली होती, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, मनसे नेत्यांची बैठक राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पार पडली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे आयोजित केले आहेत. ते या दौऱ्यांमध्ये सर्वप्रथम मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. राज ठाकरे येत्या 14 डिसेंबर रोजी मराठवाडा दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिली.

आज (शुक्रवारी) मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. दुपारी दोन वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर ही बैठक संपली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन देसाईंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राज्यात येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसंदर्भातील पक्षाच्या भूमिकेबाबत या बैठकीत रणनिती आखली गेली. त्यानुसार महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये राज ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला. यापैकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या तारखा निश्चित झाल्याची माहिती, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

दरम्यान, मनसे नेत्यांची आज आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे 14 डिसेंबर रोजी औरंगाबादमध्ये जाणार आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करताना जेवढ्या कार्यकर्त्यांची परवानगी मिळेल, तेवढ्याच संख्येने कार्यकर्ते आणि नेते या बैठकीला उपस्थित राहतील. ही बैठक सकाळी 10 वाजता होईल. त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. तसेच माध्यमांशीही संवाद साधतील. 16 डिसेंबर रोजी राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी पुण्यात जातील. त्यानंतर कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही राज ठाकरे जातील, अशी माहितीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.