भाजप आमदार राम कदम यांना कन्हैय्या कुमारने स्टेजवरच दिले ‘गोडसे मुर्दाबाद’ बोलण्याचे आव्हान


मुंबई – काँग्रेस नेता कन्हैय्या कुमारने स्टेजवरच ‘भारत माता की जय’ म्हणून दाखवा म्हणणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांना ‘गोडसे मुर्दाबाद’ बोलण्याचे आव्हान दिले आणि यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली. न्यूज १८ च्या चौपाल या कार्यक्रमात सहभागी झालेले दोन्ही नेते मंचावर असतानाच चर्चेदरम्यान एकमेकांना आव्हान देऊ लागले. कन्हैय्या कुमारने यावेळी आव्हान पूर्ण केले, पण राम कदम शेवटपर्यंत गोडसे मुर्दाबाद बोलले नाहीत. अभिनेत्री स्वरा भास्करनेही यावरुन चिमटा काढत ट्विट केले आहे.

राम कदम यांनी मंचावर असताना कन्हैय्या कुमारला ‘भारत माता की जय बोलता का?’, एकदा बोलून दाखवा…असे आव्हान देत एका जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली. १० फेब्रुवारी २०१६ मध्ये तुम्ही म्हटले होते की, माझ्या मुलाचे नाव भारत माता की जय ठेवेन, जेणेकरुन तो शाळेत गेल्यावर फी माफ करतील. यानंतर राम कदम यांना थांबवत कन्हैय्या कुमारने तुम्ही माझ्यामधला बिहारी जागा केला असल्याचे सांगत उत्तर देण्यास सुरुवात केली. मी आतापर्यंत यांच्याशी आदराने बोलत होतो, आता यांनी माझ्यातला बिहारी जागा केला आहे. संबित पात्रा होण्याची तुम्हाला हौस आहे ना…त्यांनीही हा प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यांनाही उत्तर दिले होते. उत्तर काय दिले होते सांगतो…आम्ही भारत माता की जय बोलतो…पण मग तुम्ही गांधींना मानत असाल, तर गोडसे मुर्दाबाद बोलून दाखवा, असे आव्हानच कन्हैय्या कुमारने यावेळी दिले.


राम कदम यांनी यावर आम्ही गोडसेच्या कार्याचे आम्ही कधी समर्थन केले आहे का? असा प्रश्न विचारला. यावर कन्हैय्या कुमारने उत्तर देत आरएसएसच्या कार्यालयात गोडसेचा फोटो लावला आहे, ग्वालियरमध्ये मंदिर उभारल्याचे सांगितले. राम कदम पुढे बोलताना म्हणाले की, तुम्ही गोडसे मुर्दाबाद बोला असं सांगत आहात, पण आम्ही गोडसे जिंदाबाद असे कधी म्हटले का? आम्ही कधी गांधींच्या विचारसऱणीचा अपमान केला का?. यावर कन्हैय्याने नेहमीच असे सांगत असहमती दर्शवली आणि पुन्हा एकदा ‘गोडसे मुर्दाबाद’ बोलण्याचे आव्हान दिले.

राम कदमांनी त्यावर पुन्हा एकदा आम्ही गोडसे जिंदाबादच म्हणत नाही, तर मुर्दाबाद बोलण्याचा प्रश्न कुठून येतो असे म्हटले. कन्हैय्या कुमारने त्यावर का घाबरत आहात? पक्षातून बाहेर काढतील अशी भीती वाटते का? असा टोलाही लगावला. यानंतर राम कदम यांनी गोडसेने महात्मा गांधींच्या हत्येचे केलेले कार्य चुकीचे असून निंदनीय असल्याचे सांगितले. कन्हैय्या कुमारने त्यावर वध नाही ना केला? अशी विचारणा करत टोला लगावला. यानंतर राम कदम यांनी मी कोणत्या शब्दांत बोलावे हे माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे सांगताच कन्हैय्या कुमारने त्याचप्रमाणे ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’ म्हणणे माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला बोलायला सांगणारे तुम्ही कोण? तुम्ही सांगितल्यावर मी का बोलावे? अशी विचारणा केली.