राज्यातील ओमिक्रॉनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती


जालना : कर्नाटकात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच परदेशातून येणाऱ्यांसाठी केंद्राने नियम अधिक कडक केले. परदेशी नागरिकांना भारतात आल्यानंतरही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करुन सक्तीचे विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे शेजारील राज्य असलेल्या कर्नाटकात ओमिक्रॉनचा रुग्ण सापडल्यामुळे आता महाराष्ट्र सरकार देखील सावध झाले आहे. कर्नाटकमध्ये आढलेल्या 2 ओमिक्रोनच्या रुग्णांमुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभाग देखील सतर्क झाले असून आरोग्य विभागाचे याकडे बारीक लक्ष असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान हाय रिस्क देशातून आलेले रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील 28 जणांच्या स्वॅबचे नमुने जिनोमिक सिक्वेन्ससाठी पाठवण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

ओमिक्रॉनचे दोन रुग्ण कर्नाटकामध्ये आढळल्यामुळे राज्यात सतर्कतेचे आवाहन करत राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि सर्वांना लस घेण्याचे आव्हान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान मुंबईच्या उंबरठ्यावर ‘ओमिक्रॉन’ आला आहे की काय अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे. कारण हायरिक्स असलेल्या देशातून आलेले 9 जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. या 9 जणांच्या जिनोम सिक्वेसिंग अहवालाची आता प्रतीक्षा आहे. हायरिक्स असलेल्या देशातून 10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान 2868 प्रवासी मुंबईत आले आहेत. यापैकी 485 प्रवाशांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यांपैकी 9 जण पॉझिटीव्ह आहेत. दरम्यान, या सगळ्यांचा जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्यता असून या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.