ट्विटरवरुन अचानक तुमचे फॉलोअर्स कमी झाले आहेत का? जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण


अचानक तुमच्या ट्विटर अकाऊंटवरुन फॉलोअर्सची संख्या कमी झाली आहे का? गुरुवारी रात्री आपले फॉलोअर्स अचानक कमी झाल्याचे ट्विट करत भारतातील अनेक ट्विटर युजर्सनी आश्चर्य व्यक्त करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, जवळपास शेकडो ते हजारोंनी अनेक ट्विटर युजर्सचे फॉलोअर्स कमी झाले आहेत. यासंबंधी अनेकांनी ट्वीट करत तक्रार केली आहे. ट्विटरने यासंबंधी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

पण चिंता करण्याचे काही कारण नाही. कारण फॉलोअर्स कमी झालेले तुम्ही एकटे नाही. जाणून घ्या यामागील नेमके कारण काय आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी सध्याच्या काळात समस्या राहिलेल्या बॉट्सपासून सुटका करुन घेण्यासाठी ट्विटरसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशी क्लीन अप मोहीम राबवत असतात. ट्विटरवरील फॉलोअर्स कमी होणे हा त्याचाच एक भाग आहे. पण म्हणजे नेमके काय करत आहेत हे जाणून घेऊयात.

पासवर्ड आणि फोन नंबरसारख्या माहितीची खातरजमा करण्यासाठी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वेळोवेळी अकाऊंट्सची तपासणी करत असते. या माहितीला जोपर्यंत अकाऊंटकडून दुजोरा दिला जात नाही, तोपर्यंत ट्विटर ते अकाऊंट फॉलोअर्सच्या यादीत टाकत नाही. कोणत्याही पद्धतीची फसवणूक थांबवण्यासाठी कंपनीकडून वारंवार ही प्रक्रिया राबवली जाते.

ट्विटरने याआधी देखील जून महिन्यात अशाच पद्दतीने ही प्रक्रिया राबवली होती. यावेळी काही दिवसांत ८० हजार फॉलोअर्स कमी झाल्याचे ट्विट बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी केले होते. त्यावेळी त्यांना ट्विटरने उत्तर देत, वेळोवळी तुम्हाली ही तफावत दिसेल. आम्ही ज्या अकाऊंट्सना त्यांचे पासवर्ड आणि फोन नंबरची खात्री करण्यास सांगितले आहे, ते जोपर्यंत त्याला दुजोरा देत नाही, तोपर्यंत ते फॉलोअर्सच्या यादीत जोडले जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र ट्विटर फॉलोअर्स कमी झाल्याने सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला होता. दरम्यान तुमचेही ट्विटर फॉलोअर्स कमी झाले असतील, तर चिंता करु नका. त्यांनी आपली माहिती योग्य असल्याचे सांगितल्यानंतर ते पुन्हा तुमच्याशी जोडले जातील.