ओमिक्रॉनच्या संकटामुळे गुगलने वर्क फ्रॉम होमच्या निर्णयाबाबत दिली महत्त्वाची माहिती


नवी दिल्ली – गुगलने जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे १० जानेवारी २०२२ पासून ऑफिस-टू-ऑफिस योजना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. गुरुवारी अल्फाबेट इंकची कंपनी गुगलने सांगितले की, जागतिक स्तरावर कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत, कंपनी सक्तीच्या लसीकरणाच्या नियमांनुसार काही काळासाठी वर्क फ्रॉम होम मोडवर काम करेल.

ऑगस्टमध्ये गुगलने सांगितले होते की नवीन वर्षात १० जानेवारीपासून आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करणार आहोत. त्यानंतर वर्क फ्रॉम होम पॉलिसी संपेल. गुगलच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी कर्मचाऱ्यांना सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता ऑफिस टू रिटर्न प्लॅन लागू केला जाणार नाही. पुढील परिस्थिती पाहूनच कार्यालयात परतण्याच्या योजनेबाबत निर्णय घेतला जाईल.

अमेरिकेतील सुमारे ४० टक्के कर्मचारी गेल्या आठवड्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कार्यालयात परतले आहेत. पण आता ओमिक्रॉनमुळे घरातून काम करण्यासारख्या गोष्टी पुन्हा सुरु कराव्या लागल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगणारी गुगल ही पहिली कंपनी होती. गुगलची जवळपास ६० देशांमध्ये ८५ कार्यालये आहेत.

कॅलिफोर्निया मधील माउंटन व्ह्यू नावाच्या शहरात गुगलचे मुख्यालय आहे, जे खूप प्रेक्षणीय ठिकाण आहे. २६ एकर परिसरात बांधलेल्या या कार्यालयाचे नाव गुगल प्लेक्स आहे. गुगल आणि कॉम्प्लेक्स हे शब्द एकत्र करून हे नाव ठरवण्यात आले आहे.

अनेक कर्मचारी कोरोना संकटाच्या सुरुवातीपासून जवळपास दीड वर्षांपासून घरून काम करत आहेत. जगभरात कोरोनापासून काहीसा दिलासा मिळत असताना अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केली होती. कंपन्यांनी यासाठी अनेक प्रयत्न केले होते. २०२२ च्या सुरूवातीस गुगलने आपल्या कर्मचार्‍यांना कार्यालयात आमंत्रित करण्यासाठी त्यांचे कार्यालय बायोफिलिक बनवण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये बनवल्या जाणार्‍या या ऑफिससाठी २.१ अब्ज डॉलर खर्च केल्याची माहिती समोर आली होती.