केंद्राचा राज्यांवर निशाणा; राज्यांनी दिली नाही ऑक्सिजन अभावी मृतांची आकडेवारी


नवी दिल्ली : आज लोकसभेमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंवर आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेवरुन मोठे राजकारण करण्यात आले, ऑक्सिजनचे टॅन्कर दिल्लीच्या रस्त्यांवर फिरत राहिले, पण त्याचा राज्याकडून त्याचा वापर करण्यात आला नसल्याचे सांगितले. पंजाब व्यतिरिक्त कोणत्याही राज्याने ऑक्सिजनच्या अभावी झालेल्या मृत्यू झालेल्यांची आकडेवारी दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय पुढे म्हणाले की, ऑक्सिजनचे टॅन्कर दिल्लीच्या रस्त्यांवर फिरत राहिले, पण त्याचा वापर करण्यात आला नाही. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी सांगितले की कोरोनामुळे झालेल्या मृतांची आकडेवारी राज्यांनी द्यावी, ती लपवू नये. पण राज्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. काही राज्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त ऑक्सिजनची मागणी केली.

लोकसभेत आज आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तर दिले. गुरुवारी सुरु झालेल्या कोरोनावरील चर्चेत आरोग्यमंत्री आज भूमिका मांडली. एकीकडे राज्यासह देशातील आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. त्यात कालपासून लोकसभेतही ओमिक्रॉनच्या धर्तीवर चर्चा सुरु आहे. त्यात काल महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि सरकारवर ऑक्सिजन उपलब्धतेवरुन केलेल्या टीकेला आज आरोग्यमंत्र्यांनी उत्तर दिल आहे.

ऑक्सिजनअभावी कोरोना काळात देशात किती मृत्यू झाले हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित राहिला. ऑक्सिजन अभावी चार संशयित मृत्यू झाल्याची कबुली केवळ पंजाब सरकारने दिली, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत दिली. केंद्राने राज्यांना तीनवेळा स्मरणपत्र पाठवली. 19 राज्यांनी दिलेल्या उत्तरात केवळ पंजाबने 4 मृत्यू ऑक्सिजन अभावी झाल्याची कबुली दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्ली सरकारसह विरोधकांवर निशाणा साधला.