एलन मस्क यांच्या कंपनीने लहान मुलांसाठी लॉन्च केली चारचाकी सायबरक्वाड


आपल्यापैकी अनेकांच्या मनात टेस्लाच्या गाड्यांबाबत उत्सुकता कायमच असते. एलन मस्क यांच्या कंपनीने आता लहान मुलांसाठी चारचाकी सायबरक्वाड लॉन्च केली आहे. लोकांकडून इलेक्ट्रिक सायबरक्वाडला पसंती मिळताना दिसत आहे. सायबरक्वाडची विक्री टेस्लाच्या वेबसाईटवरून केली जात आहे. एका प्लेकारसारखी सायबरक्वाड दिसते. त्यामुळे मुलांमध्ये सायबरक्वाडचे आकर्षण आहे. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी नवीन सायबरक्वाड तयार करण्यात आली आहे.

सायबरट्रकपासून प्रेरणा घेत सायबरक्वाड बाइकची डिझाइन तयार केल्याचे दिसत आहे. सायबरक्वाड तयार करण्यासाठी स्टील फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. तसेच चालवण्यासाठी आरामदायी वाटावे म्हणून उत्तम आसनव्यवस्था दिली आहे. गाडीला डिस्क ब्रेक आणि एलईडी लाइटसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. सायबरक्वाडमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर केल्यामुळे २४ किमी अंतर बाईक कापू शकते. गाडीचा वेग प्रतितास १६ किमी आहे.

तसेच पालकांकडून आवश्यकता असल्यास वेग कमी केला जाऊ शकतो. सायबरक्वाडमध्ये तीन स्पीड सेटिंग्स आहेत गाडी चार्ज होण्यासाठी ५ तासांचा अवधी लागतो. एका चार्जिंगनंतर गाडी किती धावणार हे वापरकर्त्याच्या वजन आणि रायडिंग शैलीवर अवलंबून आहे. १९०० अमेरिकन डॉलर एवढी सायबरक्वाडची किंमत आहे. म्हणजेच भारतीय चलनात म्हणायचे झाले तर जवळपास १.४२ लाख रुपये असेल. येत्या दोन ते तीन आठवड्यात सायबरक्वाडची डिलिव्हरी सुरू होणार आहे.