‘विमानाला दे धक्का’ व्हिडीओ वेगाने व्हायरल
रस्त्यात बंद पडलेली कार, रिक्षा किंवा क्वचित प्रसंगी बस धक्का देऊन चालू करण्याचे दृश्य भारतात तरी नवीन नाही. पण विमानाला सुद्धा धक्का देऊन रनवे वरून बाजूला नेण्याचा प्रकार फारसा परिचित नाही. नेपाळ मध्ये विमानाला ‘दे धक्का’ देण्याचा प्रकार नुकताच घडला असून त्या संदर्भातला एक व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तारा एअरलाईन्सचे एक विमान नेपाळच्या बजुरा कोल्टी विमानतळावर उतरत असताना त्याचा मागचा टायर फुटला. विमान रनवेवर थांबले पण टायर फुटल्याने ते रनवे वरून बाजूला करण्यात अडचण आली. यामुळे उड्डाण करण्याच्या तयारीत असलेल्या आणि लँड होणाऱ्या विमानांपुढे अडचण निर्माण झाली. अखेरी सुरक्षा रक्षकांनी हे रनवेवर अडकलेले विमान ढकलून बाजूला नेण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यांना विमानतळावरील प्रवाशांनी सुद्धा मदतीचा हात दिला आणि अखेर अनेकांच्या प्रयत्नातून विमान रेनवे वरून बाजूला नेण्यात यश आले.
विमान ढकलून नेत असतानाचा व्हिडीओ लोकांच्या औत्सुक्याचा विषय बनला आणि पाहता पाहता हा व्हिडीओ सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाला.