ओमिक्रॉनची भीती नको, अशी आहेत त्याची लक्षणे

जगभर द.आफ्रिकेत सापडलेल्या करोनाच्या नव्या व्हेरीयंट ओमिक्रॉनची दहशत बसली असतानाचा आता हा विषाणू भारतात सुद्धा दाखल झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषदेत कर्नाटक मध्ये या विषाणूचे दोन संक्रमित सापडल्याची पुष्टी केली आहे. हा विषाणू लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना सुद्धा ग्रासत आहे पण त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही असा दिलासा दिला गेला आहे.

ओमिक्रॉनची लक्षणे डेल्टा व्हेरीयंट पेक्षा वेगळी दिसली आहेत. द. आफ्रिकेत या विषाणूचे प्रथम परीक्षण करणाऱ्या डॉ. एंजेलिस यांनी दिलेल्या माहितीनुसार या विषाणूची लक्षणे डेल्टा पेक्षा वेगळी दिसली आहेत. यात अन्य व्हेरीयंट प्रमाणे स्वाद जाणे अथवा वास न येणे ही लक्षणे नाहीत. घशात खवखव आहे पण खोकला नाही. यात प्रचंड अंगदुखी, किंचित ताप आणि काही जणांना श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसत आहेत.

डेल्टा पेक्षा हे व्हेरीयंट अत्यंत वेगाने फैलावते आहे पण संक्रमित गंभीर आजारी होण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना संक्रमण झाले तरी लक्षणे अगदी सौम्य स्वरुपात आहेत. हा विषाणू ५० वेळा म्युटेट झाला आहे पण त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. घरात कुणी आजारी असेल तर त्याला वेगळ्या खोलीत ठेवणे, मास्क वापरणे, वेळोवेळी साबणाने हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, गर्दीच्या जागा टाळणे अशी खबरदारी घेतल्यास या विषाणूचा संसर्ग होण्यापासून बचाव होऊ शकेल असे आरोग्य विभागाने कळविले आहे.