इस्रायलचे तेल अवीव बनले जगातील सर्वात महाग शहर

जगात सर्वात महाग शहर म्हटले कि सिंगापूर, मुंबई, टोक्यो, लंडन, पॅरीस हीच नावे चटकन समोर येतात. मात्र यंदाच्या वर्षात या सर्व शहरांना मागे टाकून इस्रायलची आर्थिक राजधानी तेल अवीव हे जगातील सर्वात महाग शहर ठरले आहे. इकॉनॉमीक इंटेलिजन्स युनिट तर्फे बुधवारी सादर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. यापूर्वी तेल अवीव महाग शहरांच्या यादीत पाचव्या स्थानी होते.

समुद्रकिनारी वसलेल्या या शहरातील नागरिक गेली अनेक वर्षे या शहरातील राहणीमान अतिशय महाग झाल्याची तक्रार सातत्याने करत होते मात्र त्याकडे लक्ष दिले गेले नव्हते. नवीन रिपोर्ट मध्ये या नागरिकांचे म्हणणे सत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे शहर महाग होण्यामागे काही कारणे आहेत. इस्रायलचे हे आर्थिक केंद्र असल्याने येथे नोकरी आणि व्यवसायाच्या अधिक संधी आहेत. परिणामी अन्य भागातून या शहरात येणार्यांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे वाहतूक, घरांची भाडी प्रचंड प्रमाणात वाढली आहेत. पगार जास्त मिळत असल्याने तंत्रक्षेत्रातील मोठ्या वर्गाला या शहराचे आकर्षण आहे. परिमाणी रोजचे जीवनमान महाग होते आहे.

तेलअवीव नंतर महाग शहरांच्या यादीत दोन नंबरवर पॅरीस आणि सिंगापूर अशी दोन शहरे आहेत. त्या पाठोपाठ ४ नंबरवर ज्युरीख, आणि अनुक्रमे हॉंगकॉंग, न्यूयॉर्क, जिनेव्हा, कोपनहेगन, लॉस एंजेलिस, ओसाका यांचा क्रमांक आहे. महाग शहर ठरविण्यासाठी जगभरातील १७३ शहरांचा सर्व्हे केला गेला असे समजते.