‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने घेतला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंदर्भात मोठा निर्णय


नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेचा भारतीय क्रिकेट संघाचा दौरा किमान एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आला आहे. यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय सध्या क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करत आहेत. कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या दक्षिण आफ्रिकेमध्येच भारत अ संघ आहे. पण या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार सामने खेळवले जात असले तरी भारताच्या मुख्य संघाच्या नियोजित दौऱ्यामध्ये ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावाच्या दृष्टीने बदल करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. भारतीय संघ नियोजित वेळापत्रकानुसार ९ डिसेंबर रोजी चार्टर्ड विमानाने दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. पण या नियोजित वेळपत्रकातील कार्यक्रम आणि डिपार्चर सध्या स्थगित करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली आहे.

या दौऱ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल झाल्यामुळे संघामध्येही बदल होणार आहेत. सध्या भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरु असणाऱ्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या कालावधीमध्ये निवड समितीची दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी संघ निवड करण्यासाठी बैठक होणार होती. पण बीसीसीआय सध्या दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाच्या संपर्कात असून तेथील कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. हे चित्र पूर्ण स्पष्ट झाल्यानंतरच निवड समितीची बैठक घेतली जाणार आहे.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये तीन कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि चार टी-२० सामने खेळणार आहे. भारतीय संघाने सप्टेंबर महिन्यामध्ये इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमधील शेवटचा सामना खेळण्यास नकार दिला होता. संघातील सपोर्टींग स्टाफपैकी काही जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे संघाने शेवटची कसोटी खेळण्यास नकार दिला होता. इंग्लंडवरुन सर्व भारतीय खेळाडू थेट युएईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयपीएलच्या उर्वरित स्पर्धेसाठी दाखल झाले होते.