बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमिततेसाठी परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई


मुंबई – अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी करण्यात आल्याची माहिती आहे. फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वाक्षरी केली केल्यानंतर आजच आदेश निघण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यानुसार परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याआधीच सांगितले होते. परमबीर सिंह यांच्याविरोधात बेशिस्त वर्तन आणि अनियमितता यासाठी कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाईची प्रक्रियादेखील सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आज अधिकृतपणे कारवाई करण्यात आली.

परमबीर सिंह यांच्यासंबंधी आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला होता. परमबीर सिंह यांनी नागरी सेवेच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे देबाशिष चक्रवर्ती यांनी त्यांच्याविरोधात चौकशी केली होती. याशिवाय प्रशासकीय त्रुटींसाठी राज्याच्या गृह विभागाने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली होती.