आशिष शेलारांच्या वडापाव विकण्याच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर


मुंबई – दोन दिवसांचा मुंबई दौरा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. पण आता या दौऱ्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडू लागला आहे. ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावर टीका करताना भाजपने राज्यातील तरूणांना वडापाव विकायला लावणार आणि उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाणार आहात का? असा प्रश्न उपस्थित केला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन Vibrant Gujarat साठी आले आहेत? मुंबईला ओरबाडून आत्मनिर्भर गुजरात होत असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.


भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटले, vibrant Gujarat ची प्रसिद्ध झालेली जाहिरात ट्विट केली आहे. मुंबईत उद्योगपतीना भेटायला ममता बॅनर्जी आल्या, तर पोटशूळ उठला. म्हणे मुंबईतील उद्योग पळवायला आल्या आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन आज vibrant Gujarat साठी आले आहेत? मुंबईत त्यांचा रोड शो होत आहे. मुंबईला ओरबाडून आत्मनिर्भर गुजरात, असे संजय राऊत यांनी म्हटले.


संजय राऊत यांनी भाजपचे मुंबई प्रेम हे बेगडी असल्याची टीका केली. मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला पळवून नेले, तेव्हा भाजपचे बोलभिडू शेपूट घालून का बसले, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. योगी आदित्यानाथ मुंबईतील सिने उद्योग उत्तर प्रदेशात खेचण्यासाठी शर्थ करत असल्याची आठवणही राऊत यांनी भाजप नेत्यांना करून दिली.