मोदींचे कौतुक केले म्हणून अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्याची परत मागितली PhD


अलिगढ – उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्यामुळे विद्यापीठाने पीएचडीची डिग्री परत मागितल्याचा दावा करुन सध्या खळबळ उडवून दिली आहे. या विद्यार्थ्याचे नाव दानिश रहीम असे असून या प्रकरणात पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी लक्ष घालण्याची मागणी या विद्यार्थ्याने केली आहे.

अलिगढ मुस्लीम विद्यापीठाने दानिशला पीएचडीची डिग्री दिली होती. ही डिग्री आता परत मागितली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी दानिशने केली आहे. या प्रकरणी दोन्ही नेत्यांना दानिशने पत्रे लिहिली आहेत. यासंदर्भातील वृत्त द हिंदूने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, दानिशने सांगितले की, ९ मार्च २०२१ रोजी मला डिग्री देण्यात आली होती. तर माझी सहकारी मारिया नईमला नोव्हेंबर २०२० मध्ये पीएडीची डिग्री देण्यात आली होती. पीएचडी मिळून सहा महिने उलटल्यानंतर विद्यापीठाने आम्हाला ४ ऑगस्ट २०२१ रोजी एक पत्र पाठवले. त्यात आम्हा दोघांना चुकून पदवी देण्यात आल्याचे म्हटले आहे.

दानिश पुढे म्हणाला, हे पत्र मला आल्यानंतर खूप आश्चर्य वाटले आणि धक्काही बसला. पण, पंतप्रधानांचे २२ डिसेंबर २०२० रोजी कौतुक केल्याचे माझ्या लक्षात आले. पंतप्रधानांनी अलिगढ विद्यापीठाच्या कार्यक्रमाला संबोधित केले होते. तेव्हा मी त्यांचे कौतुक केले होते. माझी मुलाखतही माध्यमांनी दाखवली होती.

पंतप्रधानांची मी स्तुती केल्यानंतर मला विद्यापीठाकडून चुकीची वागणूक दिली जाऊ लागली. ८ फेब्रुवारी रोजी माझी परीक्षा होती. त्यापूर्वी चेअरमननी मला बोलवून घेतले होते. तू विद्यार्थी आहेस. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाबत तू अशी उघडपणे भूमिका मांडणे योग्य नाही. राईट विंगचा माणूस असल्यासारखेच त्या दिवशी तू बोलत होतास, असे चेअरमन मला म्हणाल्याचे त्याने सांगितले. यासंदर्भात दानिशने विद्यापीठाला पत्र देखील दिले आहे. पण त्यावर कोणतेही उत्तर आले नसून त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आपण नाईलाजाने पंतप्रधान आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान विद्यापाठीचे प्रवक्ता शैफी किडवे यांनी दानिशने केलेले आरोप चुकीचे असून त्याला चुकीच्या विषयातील पदवी देण्यात आल्यामुळे त्याला डिग्री बदलण्यास सांगितल्याचे म्हटले आहे.