दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येचा विस्फोट… एका दिवसात दुप्पटीने वाढले रुग्ण


केपटाऊन – कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटमुळे सध्या संपूर्ण जगभरामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अधिक घातक आणि वेगाने म्युटेशन होणारा हा कोरोनाचा प्रकार असल्याचे सांगितले जात असून या नव्या प्रकारच्या कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. असे असतानाच जिथे पहिल्यांदा या ओमिक्रॉनचा विषाणू आढळून आलेला त्या दक्षिण आफ्रिकेतून या चिंतेत भर टाकणारी बातमी आली आहे. बुधवारी दक्षिण आफ्रिकेमधील कोरोनाबाधितांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने दिले आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये मंगळवारी कोरोनाबाधितांची संख्या चार हजार ३७३ होती. हीच संख्या बुधवारी जवळजवळ दुपट्टीने वाढून आठ हजार ५६१ वर पोहचली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता असून त्यासंदर्भातील तयारीसाठी सज्ज रहावे असा इशारा दक्षिण आफ्रिकेतील वैज्ञानिकांनी दिला आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुढील आठवड्याभरामध्ये दुप्पटीने किंवा तिप्पटीने वाढण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेसाठी दक्षिण आफ्रिकेत स्थानिक स्तरावर काम करणारे डॉ. निक्से गुमेडे-मोइलत्सी यांनी दिला आहे. दक्षिण आफ्रिकेमधील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये पुढील काही दिवसांमध्ये फार मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला दिसू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण कमी झाले होते. हे प्रमाण सात दिवसांच्या सरासरीमध्ये सर्वात कमी म्हणजेच दिवसाला २०० रुग्ण एवढे खाली गेले होते. पण नोव्हेंबरच्या मध्यापासून पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला पॉझिटीव्हीटी रेट हा एक टक्के एवढा होता. पण काल (१ डिसेंबर २०२१ रोजी) हा दर १६.५ टक्क्यांपर्यंत गेल्याचे पहायला मिळाले. या देशामध्ये यापूर्वी जून आणि जुलै महिन्यामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येचा विस्फोट झाला होता. या कालावधीमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे दिवसाला २० हजार रुग्ण आढळून येत होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये आतापर्यंत ९० हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केवळ ओमिक्रॉन हा नवीन व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेतील रुग्णवाढीसाठी कारणीभूत आहे असे म्हणणे सध्या घाईचे ठरेल, असे तज्ञ सांगत असेल तरी हा रुग्णसंख्येचा विस्फोट ओमिक्रॉनमुळेच झाल्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नसल्याचेही सांगतात. पीसीआर चाचण्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे समजते. पण तो ओमिक्रॉनमुळे झाला आहे हे समजून घेण्यासाठी पूर्ण जेनेटिक सिक्वेन्सिंग चाचणी करावी लागते.