महाराष्ट्रात पोलीस आणि राजकारण यांची अभद्र युती झाली असून ती आता तोडण्याची संधी ; माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो


मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ एफ रिबेरो यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पोलीस आणि राजकारण यांची महाराष्ट्रात अभद्र युती झाली असून, ती आता तोडण्याची संधी असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर सचिन वाझे हा वर्दीतला गुंड असून परमबीर सिंह पोलीस दलावरचा डाग असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.

ज्युलिओ रिबेरो पुढे म्हणाले की, सध्या सुरु असलेल्या प्रकरणांमध्ये सचिन वाझेची नियुक्ती कोणी केली या प्रश्नात सगळे काही दडले आहे. ते उघड झाले की सर्व उघड होईल. हे काम अनिल देशमुख, परमबीर सिंह यांनी मिळून केले आहे. हे सर्व प्रकरण न्यायालयासमोर येणे आवश्यक आहे.

पोलीस दलाची नसबंदी अंतुले, भुजबळ, देशमुखांच्या काळात झाल्याचा घणाघाती आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, परमबीर सिंह हे चलाक असून सत्ताधारी जो असतो, ते त्याच्या बाजूने असतात. पोलीस दलासाठी परमबीर सिंह यांना फरार घोषित करणे हे लांच्छनास्पद असून भारतीय पोलीस सेवेच्या लौकिकास परमबीर सिंह यांनी डाग लावला आहे.

ज्युलिओ रिबेरो म्हणाले की, सरकारी गणवेशधारी सचिन वाझे गुंड असून तो आणि प्रदीप शर्मा हे पोलीस दलात एका विशिष्ट कारणासाठी आले आहेत. हे ठरवून केले गेले असल्यामुळे यांच्या नियुक्ती मागे नेमके कोण होते, हे जनतेसमोर यायला हवे. न्यायालयाकडून मिळालेल्या सुरक्षेनंतर परमबीर सिंह हे अचानक कसे प्रकट झाले? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

परमबीर सिंह यांचा केंद्र सरकार वापर करत असल्याचा आरोपही ज्युलिओ रिबेरो यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात परमबीर सिंह यांची महत्त्वाच्या पोस्टिंगवर नियुक्ती कशी करण्यात आली? काही वर्षात झटपट श्रीमंतीच्या प्रलोभनाला बळी पडणाऱ्या आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. राजकारण्यांनी या अधिकाऱ्यांच्या मदतीनेच महाराष्ट्रासह देशभरामध्ये हैदोस घातला आहे. ही अभद्र युती तोडण्याची आता ही योग्य वेळ आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या स्पर्धा परीक्षेतून 24 ही वयोमर्यादा शिथिल करणे, हे घसरणीचा मार्ग खुला करणारे ठरले, असे ज्युलिओ रिबेरो म्हणाले. रिबेरो यांनी आर.आर. पाटील यांच्या काळात चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावे एक पत्र लिहून पाटील यांना कळवली होती. त्यावर आर.आर. पाटील यांनी चोख काम केल्याचेही त्यांनी सांगितले.