काल दिवसभरात देशात 9765 कोरोनाबाधितांची नोंद, तर रुग्णांचा 477 मृत्यू


नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनशी संपूर्ण जग झुंज देत आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग जगभरातील 25 देशांमध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे, भारतात अद्याप कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तरी देखाली ओमिक्रॉनच्या जगभरातील वाढत्या धोक्यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या आटोक्यात आला आहे. काल दिवसभरात देशात 9765 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आतापर्यंत एकूण 3 कोटी 46 लाख 06 हजार 541 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात एकूण 477 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 4 लाख 69 हजार 724 वर पोहोचली आहे. तसेच देशात सध्या 99,763 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, ज्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत चढ उतार पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात राज्यात 767 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 903 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 84 हजार 338 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.71 टक्के आहे. काल (बुधवार) राज्यात 28 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7591 बाधितांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 74 हजार 812 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत, तर 923 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,56,19,951 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.