ममता बॅनर्जींच्या या टीकेला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे उत्तर


मुंबई – मुंबई दौऱ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या टीकेनंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा आवळला आहे. ममता बॅनर्जी यांनी देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची आवश्यकता आहे, पण कोणी लढण्यास तयार नसल्यास किंवा सारखे परदेशात जात असल्यास आम्ही तरी काय करणार, असा सवाल करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. त्याचबरोबर त्यांनी यावेळी युपीएचे अस्तित्व आहेच कुठे, अशी विचारणाही केली. दरम्यान राज्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ममता बॅनर्जींच्या या टीकेवर प्रतिक्रिया दिली असून काँग्रेस हा फक्त पक्ष नाही तर विचार आहे. आम्ही अशा वक्तव्यांनी अस्वस्थ होणार नसल्याचे एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे.

आज ममता बॅनर्जी युपीएच्या सदस्यही नाहीत. भाजपला जो विरोध आतापर्यंत केला आहे, तो काँग्रेसने, युपीएने, राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. शेवटी नेतृत्व काँग्रेसलाच करावे लागणार असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. दरम्यान त्यांना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वास्तव स्विकारण्यासंबंधी दिलेल्या सल्ल्याबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले की, काँग्रेसला नबाव मलिकांनी सल्ला द्यावे, हे काही योग्य नाही. काँग्रेसला सल्ला द्यावा अशी त्यांची पात्रताच नाही. देशात काँग्रेस पक्ष असून तो भाजपला विरोध करणारा आहे. पर्याय म्हणून काँग्रेस असून सर्वांचे सहकार्य घ्यावे लागेल हे खरे आहे. युपीए सर्वांचे सहकार्य घेतच असते, असेही यावेळी ते म्हणाले.