कर्नाटकमध्ये सापडले ओमिक्रॉन व्हेरिएंटचे २ रुग्ण!


नवी दिल्ली – जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण करणारा कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिएंट अद्याप भारतापासून दूर असल्यामुळे देशातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. पण, भारतीयांची ही निश्चिंतता अल्पजीवी ठरली आहे. कारण ओमिक्रॉनचे दोन रुग्ण भारतात आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याचे सांगितले असून आत्तापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण एकूण २९ देशांमध्ये आढळल्याचे देखील सांगितले. त्यामुळे ओमिक्रॉन आता हळूहळू हातपाय पसरायला लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.


केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान अवघ्या दोनच दिवसांपूर्वी लोकसभेत बोलताना देशात एकही ओमिक्रॉनचा रुग्ण नसल्याची माहिती दिली होती. त्यामुळे दक्षिण अफ्रिका आणि अफ्रिकेतील इतर काही देशांमध्ये आढळलेला हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट भारतापासून अद्याप दूर असल्याचा दिलासा देशवासीयांना मिळाला होता. पण, आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन ओमिक्रॉन व्हेरिएंट कर्नाटकमधील दोन रुग्णांमध्ये आढळल्याची माहिती दिली आहे. आत्तापर्यंत २९ देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले एकूण ३७३ रुग्ण सापडल्याचे देखील आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


दरम्यान, कर्नाटकमध्ये सापडलेले ओमिक्रॉनबाधित हे दोन्ही रुग्ण परदेशी नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. या दोघांचे वय ६६ वर्षे आणि ४६ वर्षे असे असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चौकशी करून त्यांची चाचणी करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ओमिक्रॉनची लागण झालेल्या या दोघांमध्ये कोरोनाची अत्यंत सौम्य लक्षणे असून कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नसल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडल्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसली, तरी सतर्क रहाणे आवश्यक आहे. कोरोनाचे नियम पाळणे आणि गर्दी टाळणे हे महत्त्वाचे असल्याचे लव अग्रवाल म्हणाले.

दरम्यान नुकत्याच दक्षिण अफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेली एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली होती. दक्षिण अफ्रिकेतच ओमिक्रॉनचे मोठ्या प्रमाणावर बाधित आढळून आल्यामुळे सगळीकडे भितीचे वातावरण पसरले होते. हा रुग्ण ओमिक्रॉनचाच आहे की कोरोनाच्या इतर व्हेरिएंटचा, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. या व्यक्तीच्या चाचणीचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सकाळी दिली आहे.