भारतीय नागरीकत्वासाठी कतरिनाला विवाहानंतर ७ वर्षे करावी लागणर प्रतीक्षा

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांचा विवाह सोहळा ७ ते ९ डिसेंबर या काळात राजस्थानातील सवाई माधोपुर येथील फोर्ट बरवाडा येथे होत आहे. हिंदू रिवाजानुसार हा विवाह होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील तीन पुरोहित आमंत्रित केले गेल्याची बातमी आहे. या विवाहाअगोदर कतरिना आणि विक्की मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. मात्र विवाह झाल्यानंतर सुद्धा कतरिनाला लगेच भारतीय नागरिकत्व मिळणार नाही तर त्यासाठी सात वर्षे प्रतीक्षा करावी लागेल असे समजते.

कतरिनाचे मुळ नाव कतरिना टरक्वाट असे असून ती ब्रिटीश नागरिक आहे. लग्नानंतर भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी तिला कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल. विदेशी वधू आणि देशी वर स्पेशल मॅरेज अॅक्ट १९५५ नुसार विवाह करू शकतात. हाच कायदा विभिन्न धर्म, जाती, संप्रदाय यांच्यातील विवाहासाठी लागू होतो. कायदेतज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार विदेशी आणि भारतीय यांच्यात विवाह झाल्यावर भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी त्या व्यक्तीला सात वर्षे भारतात वास्तव्य करावे लागते आणि नागरिकत्वसाठी अगोदर अर्ज करावा लागतो.

युके मध्ये मात्र विवाह होताच त्वरित युकेचे नागरिकत्व मिळते. कतरिना गेली १७ वर्षे बॉलीवूड मध्ये कार्यरत आहे मात्र तरीही तिला लगेच भारतीय नागरिकत्व मिळणार नाही कारण विवाह झाल्यावर तिला सात वर्षे भारतात वास्तव्य करणे बंधनकारक आहे. दुसरा पर्याय असा असतो कि गेल्या १४ वर्षात परदेशातील कुणीही व्यक्ती सलग ११ वर्षे भारतात राहिली असेल आणि नागरीकत्वासाठी अर्ज केल्यावर सलग १ वर्ष भारतात राहत असेल तर त्यांना नागरिकत्व मिळू शकते. कतरिना या पद्धतीने नागरिकत्व मिळवू शकेल पण असे नागरिकत्व तिला विवाह न करताही मिळू शकते.