चीन ३ लाख सुपरपॉवर सोल्जर बनविण्याच्या तयारीत

जगातील सर्वात मोठे लष्कर चीन कडे असूनही सैन्य वाढविण्याचा उद्योग चीनने सुरूच ठेवला असून आता ३ लाख नवे सुपरपॉवर सैनिक चीन प्रशिक्षित करत असल्याचे वृत्त सरकारी संस्था सिन्हुआने दिले आहे. या सैनिकांना सीमा भागात तैनात केले जाणार आहे. यामुळे भारताची चिंता वाढली आहे कारण चीन आणि भारत यांच्यात ३४८८ किमीची सीमा आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हेच चीनी लष्कराचे मुख्य कमांडर आहेत. त्यांनी सेना संमेलनात बोलताना सुपरपॉवर सैनिक तयार करण्याचे आदेश दिले होते. तसेच लढणे आणि जिंकणे हेच सेनेचे पहिले आणि शेवटचे लक्ष्य आहे असे बजावले होते. चीनची ही नवी सुपरपॉवर सेना २०२७ पर्यंत तयार होणार आहे. कारण या वर्षी पीपुल्स लिबरेशन आर्मीचा शताब्दी समारोह होत आहे.

चीनने विस्तारवादासाठी जी ध्येये निश्चित केली आहेत त्यासाठी भरभक्कम सेना हवी असा या सुपरपॉवर सोल्जर मागचा विचार आहे. सुरक्षा तज्ञांच्या मते चीन आज ज्या ज्या भूभागावर आणि समुद्री भागावर दावा करत आहे ते सर्व भूभाग कब्जात घेण्याचा चीनचा प्रयत्न आहे. याचा सर्वात मोठा धोका भारताला आहे. डोक्लाम घटनेनंतर चीन सेना मजबुतीकरण करण्याच्या मागे आहे. लदाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि अन्य काही सीमा भागात चीनने वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र दरवेळी भारतीय सेनेने त्यांचा डाव हाणून पाडला आहे.

विशेष म्हणजे चीनच्या सीमा १८ देशांशी जुळलेल्या आहेत. या सर्व सिमांबाबत विवाद आहेत. त्यात जपान, नेपाल, तैवान, व्हिएतनाम, भूतान, पाकिस्तान, कंबोडिया, इंडोनेशिया, ब्रुनेई या देशाचा समावेश आहे.