ट्वीटरची कमान मिळताच अॅक्शन मोड मध्ये आले पराग अग्रवाल

ट्वीटर या मायक्रोब्लॉगिंग साईटच्या सीईओ पदाचा कार्यभार हाती येताच पराग अग्रवाल त्वरित अॅक्शन मोड मध्ये आले असल्याचे दिसले आहे. सप्टेंबर मध्ये लागू झालेल्या ट्वीटरच्या सेफ्टी मोड नुसार खासगी फोटो, व्हिडीओ परवानगीशिवाय शेअर करण्यावर बंदी घातली गेली असून अग्रवाल यांनी या बंदीचे उल्लंघन करणाऱ्याचे अकौंट सात दिवस ब्लॉक केले जाईल असे स्पष्ट केले आहे.

ट्वीटरच्या नियमानुसार विना परवानगी संबंधित व्यक्तीचे फोटो, व्हिडीओ शेअरिंग पोस्ट काढून टाकता येतात पण लोकप्रिय सेलेब्रिटी, विशेषज्ञ यांना हे धोरण लागू होत नाही. याचे कारण त्यांची ट्वीट सार्वजनिक हितासाठी मानली जातात. विना परवानगी फोटो, व्हिडीओ शेअर केल्याचे अनेक प्रकार दररोज समोर येतात आणि बरेच वेळा त्यात खासगी फोटो, व्हिडीओ शेअर केले जातात त्याचा संबंधित व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. असले प्रकार गुन्हा या सदरात धरले जाणार आहेत.

अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार असल्या प्रकारांचा सर्वाधिक त्रास महिला, सामाजिक कार्यकर्ते, अल्पसंख्याक समुदाय यांना होतो. अश्या काही प्रकारांबाबत संबंधितानी तक्रार केली तर ज्यांनी हा गुन्हा केला त्यांच्याविरोधात कडक पावले उचलली जाणार आहेत.

ट्वीटरच्या पॉलीसी नुसार कुणी व्यक्ती दुसऱ्याचे खासगी फोटो, माहिती (फोन नंबर, आयडी) पोस्ट करत असेल तर तो गुन्हा आहे. तसेच पोस्टच्या माध्यमातून धमकी देणे, त्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला प्रोत्साहित करणे हाही गुन्हा आहे. मिडिया व अनेक उपद्व्यापी लोक खासगी माहितीचा दुरुपयोग करतात आणि ही बाब चिंताजनक आहे असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.