एनडीए पहिल्या महिला स्क़्वाड्रन साठी तयार
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीए सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पहिल्या महिला स्क़्वाड्रन साठी तयार झाली आहे. जून मध्ये महिलांची पहिली स्क़्वाड्रन एनडीए मध्ये दाखल होत असून त्यात १९ मुलीना प्रवेश दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यातील १० मुली आर्मी मध्ये, ६ मुली हवाई दलात तर ३ मुली नौसेनेत अधिकारी म्हणून रुजू होतील. पहिली स्क़्वाड्रन तीन वर्षात प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडणार असून या स्क़्वाड्रनचे नामकरण ‘सिएरा’ असे केले गेले आहे.
एनडीएच्या पूर्ण प्रशिक्षण काळात सहा महिन्याची एक अश्या सहा टर्म असतात. त्यामुळे दर सहा महिन्यांनी नवीन कॅडेट दाखल केले जातात. सध्या एनडीए कॅडेट च्या १८ स्क़्वाड्रन असून १९ वी स्क़्वाड्रन महिलांची असेल. पुरुष स्क़्वाड्रन मध्ये १०० ते १२० कॅडेट असतात. तर मुलींच्या स्क़्वाड्रन मध्ये १९ मुलीना प्रवेश दिला जाणार आहे.
एनडीए मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींच्या तुकडीसाठी प्रीफॅब शेल्टर बनविले गेले असून तेथे सर्व सुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत. या तुकडीसाठी एक महिला अधिकारी आणि महिला डॉक्टर नेमले जात आहेत. मुलीच्या प्रवेशापूर्वी पीटी उस्ताद आणि ड्रिल उस्ताद यांना चेन्नई येथे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. पुरुष आणि महिला प्रशिक्षणात कश्या प्रकारचे ट्रेनिंग द्यायचे यासाठी हे प्रशिक्षण आहे असे समजते.