फोटो, व्हिडीओ शेअर करण्यासंदर्भात ट्विटरचा नवा नियम


नवी दिल्ली – मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरला कालच नवे सीईओ मिळाल्यानंतर ताबडतोब काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. अन्य वापरकर्त्याच्या संमतीशिवाय ट्विटर वापरकर्त्यांना त्यांचे खाजगी फोटो, व्हिडीओ शेअर करण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. नवीन नियमांनुसार, अन्य लोक यूजरच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करु शकणार नाहीत. ट्विटरने हे पाऊल शोषण विरोधी धोरणाला अधिक मजबूत करण्यासाठी उचलले असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत अधिकृत माहिती देताना ट्विटरने म्हटले आहे की, जे लोक नव्या नियमांच्या अंतर्गत पब्लिक फीगर नाहीत, ते लोक ट्विटरला त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ हटवण्याबाबत सांगू शकणार आहेत, जे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय पोस्ट केले केले आहेत. ट्विटरने पुढे म्हटले आहे की, त्या लोकांसाठी हे धोरण नाही, जे प्रसिद्ध व्यक्ती (Public Figure) आहेत. त्यांच्या ट्विट्सला सार्वजनिक हितासाठी शेअर केले जाऊ शकते.

ट्विटरच्या मते खाजगी फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यामुळे एखाद्या व्यक्तिच्या गोपनियतेचा भंग होऊ शकतो. त्यामुळे त्या व्यक्तिचे भावनिक किंवा शारिरीक नुकसान होऊ शकते. कंपनीने पुढे म्हटले आहे की, सर्वांनाच खाजगी माध्यमांचा दुरुपयोग प्रभावित करु शकतो, पण महिला कार्यकर्त्या, अल्पसंख्यांक समाजाच्या सदस्यांवर याचा विपरित परिणाम होऊ शकतो.