एसटी कर्मचाऱ्यांच्या नव्या वेतनाबाबतचे परिपत्रक परिवहन मंत्री अनिल अरब यांनी केले जाहीर


मुंबई – एसटी बस कर्मचाऱ्यांच्या मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याची घोषणा राज्य सरकारने केली. परिवहन मंत्री अनिल अरब यांनी आता एसटी कर्मचाऱ्यांच्या नव्या वेतनाबाबतचे परिपत्रकच जाहीर केले आहे. यात नव्या घोषणेनुसार कोणत्या एसटी कर्मचाऱ्याचा पगार किती होणार याची माहिती देण्यात आली आहे. या परिपत्रकानुसार चालक वाहकापासून तर मेकॅनिकपर्यंत पद आणि सेवेच्या वर्षानुसार ही पगारवाढ झाली आहे.

सुधारीत वेतनवाढीनुसार नव्याने नियुक्ती मिळालेल्या आणि १० वर्षांच्या आतील अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ५,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १० वर्ष, १ दिवसापासून ते २० वर्षांपर्यंतची सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना ४,००० रुपयांची पगारवाढ करण्यात आली आहे. तसेच २० वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात २ हजार ५००० रुपयांची पगारवाढ करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता दिला जातो. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच पगारवाढ केली जावी, ही बाब देखील मान्य झाली आहे. या बाबी करारामध्ये होत्या. पण बेसिकचा विषय होता. म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की जे कर्मचारी १ ते १० वर्ष या श्रेणीत आहेत, या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ठोक ५ हजारांची वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१२ हजार ०८० रुपये ज्याचे मूळ वेतन होते, त्यांचे वेतन आता १७ हजार ३९५ झाले आहे. मूळ वेतन १७ हजार ०८० वरून २४ हजार ५८४ रुपये झाले आहे. त्यामुळे जवळपास ७ हजार २०० रुपयांची पगारवाढ पहिल्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांची झाली आहे. जवळपास ४१ टक्के एवढी ही वाढ असून एसटीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वाढ आहे.

१० ते २० वर्षांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ४ हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचा पूर्ण पगार २३ हजार ०४० होता, तो आता २८ हजार ८०० रुपये झाला आहे. २० वर्षांहून अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात २ हजार ५०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ वेतन २६ हजार आणि स्थूल वेतन ३७ हजार ४४० होते, त्यांचे वेतन आता ४१ हजार ०४० झाले आहे. ज्यांचे मूळ वेतन ३७ हजार होते आणि स्थूल वेतन ५३ हजार २८० होते, त्यांना २५०० रुपयांची वाढ केल्यामुळे मूळ वेतन ३९ हजार ५०० तर स्थूल वेतन ५६ हजार ८८० होईल.