सात डिसेंबरपर्यंत रायगडावर पर्यटकांना प्रवेशबंदी


रायगड – सात डिसेंबर रोजी किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी रायगड किल्ला सात डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती रायगड-अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

किल्ले रायगडबरोबरच रायगड रोप-वेही तीन डिसेंबर २०२१ ते सात डिसेंबर २०२१ दरम्यान पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे. रायगडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेच नातेगाव ते पाचड मार्ग सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पर्यटकांची गौरसोय होऊ नये म्हणून या हेतूने दौऱ्याच्या दोन दिवस आधीच ही माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.


राष्ट्रपतींना रायगड भेटीचे भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आमंत्रण दिले होते. राष्ट्रपतींनी हे आमंत्रण स्वीकारले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दिनांक ७ डिसेंबर (२०२१) रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना संभाजीराजेंनी राष्ट्रपती रायगडाला भेट देणार ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब असल्याचे संभाजीराजे ट्विटरवरुन म्हणाले होते.