आयपीएलच्या पुढील पर्वासाठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी आली समोर


मुंबई – अनेक संघांनी आपल्या महत्वाच्या खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील म्हणजेच २०२२ च्या पर्वाआधी करार मुक्त केले आहे. अनेक मोठ्या खेळाडूंची नावे करार मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये आहे. मुक्त करण्यात आलेल्या खेळाडूंना जानेवारीत होणाऱ्या भव्य लिलावप्रक्रियेत संघांना पुन्हा खरेदी करता येऊ शकेल. याच खेळाडूंची माहिती आम्ही आज तुम्हाला देत आहोत.

पंजाब किंग्सच्या संघाने के. एल. राहुलला रिटेन केलेले नाही. भारतीय संघातील के. एल. राहुल हा महत्वाचा खेळाडू असून सलामीवीर म्हणून सध्या उत्तम कामगिरी करत आहे. आयपीएलमध्ये ९४ सामने के. एल. राहुल खेळाला आहे. तो एक उत्तम यष्टीरक्षकही आहे. ९४ सामन्यांमध्ये राहुलने एकूण तीन हजार २७३ धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतके आणि २७ अर्धशतकांचा सामावेश आहे.

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या शिखर धवनलाही करार मुक्त केले आहे. या टी २० स्पर्धेत आतापर्यंत धवनने ५ हजार ७८४ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीनंतर धवनचाच नंबर लागतो. विराटच्या नावावर सहा हजार २८३ धावा आहेत.

दिल्लीच्या संघाने भारतीय संघांमध्ये नुकतेच पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरलाही रिटेन केलेले नाही. यापूर्वी दिल्लीच्या संघाचे नेतृत्वही श्रेयसने केले आहे. अय्यरच्या नेतृत्वाखालीच दिल्लीचा संघ पहिल्यादा अंतिम सामन्यामध्ये पोहचला होता. अय्यरने ८७ सामन्यांमध्ये २ हजार ३७५ धावा केल्या असून त्यामध्ये १६ अर्धशतकांचा समावेश आहे.

सनरायझर्स हैदराबाद या संघाने ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरलाही रिटेन केलेले नाही. आयपीएलमध्ये १५० हून अधिक सामने वॉर्नरने खेळले असून त्याच्या नावावर ५ हजार ४४९ धावा आहेत. वॉर्नरने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चार शतके आणि ५० अर्धशतके ठोकली आहेत.

दिल्लीच्या संघाने अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही रिटेन केलेले नाही. २०२१ च्या आयपीएलमधील १३ सामन्यांमध्ये अश्विनने सात गडी बाद केले होते. तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघांमध्ये आहे.

मुंबई संघाला अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि यष्टीरक्षक इशान किशन यांना मुक्त करावे लागले. अनेक वर्षे मुंबईसाठी हार्दिकने विजयवीराची भूमिका बजावली. पण, हार्दिकला मागील काही काळात कामगिरी सातत्य न राखल्यामुळे त्याला संघाबाहेर करण्यात आले.

सनरायझर्स हैदराबादने अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला रिटेन केलेले नाही. आता राशिद खानवर लिलावामध्ये बोली लागणार आहे. राशिद खान हा जगभरामधील वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये खेळतो.