दक्षिण अफ्रिकेतील ओमिक्रॉनचा सर्वात प्रथम शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचा खुलासा


जोहान्सबर्ग – जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट लवकरच संपुष्टात येईल अशी अपेक्षा असतानाच नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगावर भीतीचे सावट निर्माण केले आहे. कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली असून यानंतर अनेक देशांनी निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत सापडला असून तिथून येणाऱ्या वाहतुकीवर अनेकांनी बंदी घातली आहे. दरम्यान कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट नेमका कसा आणि कुठे सापडला याबद्दल खुलासा झाला आहे. दक्षिण अफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल महत्वाची माहिती दिली असून आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे.

जेव्हा आपण नोव्हेंबर महिन्यात नमुने पाहिले, तेव्हाच याचा खूप मोठा परिणाम होणार असल्याची जाणीव झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जे मी पाहत होती, ते पाहिल्यानंतर मला धक्काच बसला होता. प्रक्रियेत काही चूक तर नाही झाली ना असा प्रश्नही मी उपस्थित केला होता, अशी माहिती रकेल वियाना यांनी दिली आहे. दक्षिण अफ्रिकेतील लॅन्सेट लॅबमध्ये रकेल वियाना कार्यरत आहेत.

याआधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत नमुन्यांमध्ये वेगळेपण आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ जोहान्सबर्गमध्ये असणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेलबल डिसीजला यासंबंधी अलर्ट दिल्यानंतर त्यांनी नोव्हेंबरच्या २०-२१ तारखेला मोठ्या प्रमाणात चाचणी करण्यास सुरुवात केली. व्हेरिएंटचे उत्परिवर्तन पाहिल्यानंतर एनआयसीडीच्या शास्त्रज्ञांनाही कोरोनाचा नवा विषाणू येत असल्याचे लक्षात आले. गेल्या काही आठवड्यात वाढलेली बाधितांसंख्या लक्षात घेता त्यांची याबाबत खात्री पटली होती.

जोहान्सबर्ग आणि प्रिटोरियाच्या आसपास २३ नोव्हेंबरला आणखी ३२ नमुन्यांची चाचणी केली असता, हे स्पष्ट झाले अशी माहिती एनआयसीडीच्या डॅनियल यांनी दिली आहे. हे खूप भीतीदायक असल्याचेही ते म्हणाले आहेत. त्याचदिवशी एनआयसीडीच्या टीमने आरोग्य विभाग आणि नमुन्यांची चाचणी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील इतर प्रयोगशाळांना याची माहिती दिली. यावेळी त्यांनीही हाच निष्कर्ष काढला.

शास्त्रज्ञांनी ग्लोबल सायन्सच्या डेटाबेसमध्ये ही माहिती दिली. यावेळी बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्येही अशाच केसेस रिपोर्ट झाल्याची माहिती एनआयसीडीला मिळाली. गांभीर्य लक्षात घेत जागतिक आरोग्य संघटनेला कळवण्यात आले. दक्षिण अफ्रिकेत काही दिवसांतच ओमिक्रॉनने पसरण्यास सुरुवात केली. काही प्रांतामध्ये नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळू लागले. ओमिक्रॉनने दक्षिण अफ्रिकेत भीतीचे वातावरण निर्माण केले असून आठवड्याच्या शेवटी १० हजार रुग्ण होण्याची भीती आहे. दुसरीकडे कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट किती धोकादायक आहे, तसेच लसींमुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीवरही परिणामकारक आहे का याची माहिती शास्त्रज्ञ घेत आहेत.