हिवसाळा ; मुंबईसह राज्यभरात पावसाची हजेरी


मुंबई : राज्यभरात पावसाने ऐन हिवाळ्यात हजेरी लावल्यामुळे दाणादाण उडाली आहे. कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात तयार होत असल्यामुळे राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे.

राज्यभरात दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबारसाठी आज ऑरेंज अलर्ट या भागातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे राज्यभरातील विविध भागांत दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस अनुभवायला मिळणार आहे.

23.8 अंश सेल्सिअसवर मुंबईतील किमान सरासरी तापमान पोहोचले आहे. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग अधिक असल्यामुळे मच्छिमारांना आज आणि उद्या समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टी भागात आज वाऱ्यांचा वेग अधिक असणार तर उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात उद्या वाऱ्यांची तीव्रता वाढणार आहे.

ऑक्टोबरमध्ये हिट आणि पावसाळा अनुभवल्यानंतर नोव्हेंबरमध्ये देखील वरुणराज बरसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात 30 नोव्हेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे आंध्र प्रदेश, तामिळनाडूत पाऊस होतो आहे. अशातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आली आहे. तिकडे विदर्भात मात्र थंडीने जोर पकडला असून अनेक जिल्ह्यातील किमान सरासरी तापमान 15 अंश सेल्सिअस खाली आल्यामुळे अनेक शहरांमध्ये गारवा निर्माण झाला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो. प्रामुख्याने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 1 आणि 2 डिसेंबर रोजी पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि औरंगाबादमध्ये काही ठिकाणी सरी कोसळतील. अशात शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो.

विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतच्या पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात पावसाची मेघगर्जनांसह शक्यता आहे, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यांना देखील 1 आणि 2 डिसेंबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ह्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.