आर्यन खान प्रकरणावरुन भाजपवर ममता बॅनर्जींची जोरदार टीका


मुंबई – दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असून त्यांनी मंगळवारी सिव्हिल सोसायटी सदस्यांशी संवाद साधला. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्यासहित शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, मेधा पाटकर, तुषार गांधी असे कला, सामाजिक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक दिग्गज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी सर्वांशी संवाद साधत ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान यावेळी त्यांनी आर्यन खान प्रकरणावरुन भाजपवर जोरदार टीका केला.

शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आल्याची टीका करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपला क्रूर आणि अलोकतांत्रिक पक्ष असल्याचे म्हटले. महेशजी (चित्रपट दिग्दर्शक) तुम्हाला लक्ष्य करण्यात आले होते, तसाच त्रास शाहरुख खानलाही देण्यात आला. जर आपल्याला जिंकायचे असेल, तर आपल्याला लढले आणि बोलले पाहिजे. आम्हाला राजकीय पक्ष म्हणून तुम्ही मार्गदर्शन करा आणि सल्ला द्या, असे ममता बॅनर्जींनी यावेळी म्हटले.

त्यांनी पुढे म्हटले की, भारताला मॅनपावर आवडते, मसल पावर नाही. अलोकतांत्रिक पक्षाचा आपण सामना करत आहोत. जर आपण सोबत असू तर नक्कीच जिंकू. सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले, तर भाजपचा पराभव करणे सोपे होईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी संवाद साधताना मराठीत सुरुवात करत महाराष्ट्रातील जनतेला माझे विनम्र अभिवादन आणि शुभेच्छा असे म्हटल्यानंतर उपस्थितांनीही टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.

त्यांनी यावेळी रवींद्रनाथ टागोर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून संस्कृतीचेही केंद्र आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये पूल असल्याचे सांगत महाराष्ट्र आणि बंगालचे नाते चांगले असल्याचेही त्यांनी सांगितले. फक्त भाषण देण्यापेक्षा मला ऐकायला जास्त आवडते, असे सांगताना ममता बॅनर्जी यांनी यावेळी पश्चिम बंगाल सरकारच्या योजना आणि कामांचीही माहिती दिली.