भाजपविरोधी आघाडीचे ममता बॅनर्जींनी दिले संकेत!


मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. ममता बॅनर्जी त्याआधी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्यासाठी सज्ज होत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर ममता बॅनर्जी आता तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून यात शरद पवारांच्या भेटीचे देखील नियोजन करण्यात आल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर ममता बॅनर्जी नव्या आघाडीच्या तयारीत तर नाही ना? अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांनी आज त्याचेच संकेत मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये बोलताना दिले.

मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये ममता बॅनर्जींनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. या चर्चेमध्ये बोलताना त्यांनी भाजपविरोधी राष्ट्रीय आघाडीचे संकेत दिले आहेत. ममता बॅनर्जी यांनी वाय. बी. सेंटरमध्ये घेतलेल्या चर्चेमध्ये स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, मुकुल रोहतगी, मेधा पाटकर, रिचा चड्डा, तुषार गांधी, विद्या चव्हाण आदी मान्यवरांचा समावेश होता. ममता बॅनर्जी यांनी या चर्चेदरम्यान राजकीय मुद्द्यांवर बोलताना भाजपाच्या पराभवाचा फॉर्म्युला सांगतानाच भाजपविरोधी आघाडीचेही अप्रत्यक्षपणे संकेत दिले.

भाजपला देशात पराभूत करायचे असेल, तर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. सर्व प्रादेशिक पक्ष जर एकत्र आले, तर भाजपला राष्ट्रीय पातळीवर पराभूत करणे सोपे असल्याचे ममता बॅनर्जी यांनी यावेळी नमूद केले. सातत्याने मैदानात उतरून तुम्ही भाजपसोबत लढत राहायला हवे. नाहीतर ते तुम्हाला बाहेर ढकलून देतील. पश्चिम बंगालमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असतानाही मला बाहेर पडावे लागले. जेणेकरून इतरही (प्रादेशिक पक्ष) बाहेर पडतील आणि राजकारणात स्पर्धा तयार होईल, असे देखील त्यांनी नमूद केले.

आपल्या मुंबई दौऱ्यामध्ये ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीचे देखील नियोजन केले होते. पण, उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीच्या कारणामुळे ही भेट रद्द करावी लागली. पण, मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर काही दिवसांनी ममता बॅनर्जी राजस्थानच्या दौऱ्यावर देखील जाणार आहेत. गोवा, मेघालय, त्रिपुरा आणि आसाम या राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी याआधीच जाहीर केल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर तृणमूल काँग्रेसला प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. तसेच, २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांची मोट बांधायला त्यांनी सुरूवात केल्याचा तर्क त्यांच्या भेटीगाठींवरून लावला जात आहे.