तीन डिसेंबरपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये पडणार पाऊस


मुंबई – बुधवार सकाळपासूनच मुंबई, पुणे आणि कोणक किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. सकाळपासूनच मुंबई मुख्य शहरांबरोबरच उपनगरांमध्येही ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरु आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रायगड, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे आणि सातारा जिल्ह्यामधील काही ठिकाणी दुपारच्या सुमारास सौम्य स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यात आहे. सकाळी ११ च्या सुमारास हा इशारा देण्यात आला असून तो पुढील तीन ते चार तासांसाठी देण्यात आला आहे.

दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती झाली असल्यामुळे दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये येत्या २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या अनेक भागांत पुढील तीन दिवस म्हणजेच १ डिसेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात निर्माण होऊन ४८ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड अशा विविध ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे.

मंगळवारी दिवसभरात राज्यात कमाल तापमानात घट झाल्याची नोंद करण्यात आली असून कोणत्याही भागात पाऊस झालेला नाही. विविध ठिकाणी ढगाळ हवामान होते. राज्यात सर्वाधिक ३४.५ अंश सेल्सिअस तापमान रत्नागिरीत, तर सर्वात कमी १०.९ अंश सेल्सिअस तापमान गोंदियात नोंदवण्यात आले.

वादळी हवामानासह उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ४५-५५ किलोमीटरवरून ताशी ६५ कि.मीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनाऱ्यावर वादळी हवामानासह वाऱ्याचा वेग ताशी ४०-५० कि.मी. प्रतितास जाण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.