खाद्यतेलात भेसळ करणाऱ्याला थेट गोदामात जाऊन ‘मनसे स्टाईल’ दणका


मुंबई – FSSAI ची बारीक नजर भेसळयुक्त खाद्यपदार्थ किंवा इतर कोणत्याही बाबींवर असते. पण, हे प्रकार तरीदेखील सर्रासपणे सुरू असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. या प्रकारातून लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचा भयंकर प्रकार हे भेसळ करणारे व्यावसायिक करत असतात. मनसेने नालासोपाऱ्यामध्ये असाच एक प्रकार उघड केला असून सर्रासपणे खाद्यतेलामध्ये भेसळ केली जात असल्याचे या ठिकाणी दिसून आले. मनसे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी संध्याकाळी या गोदामामध्ये धाड टाकली. यावेळी गोदाम मालकाला मनसे स्टाईलने ‘दणका’ देण्यात आल्याचा व्हिडीओ अविनाश जाधव यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.

नालासोपारा फाट्यावर गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे खाद्यतेलांमध्ये भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. हे खाद्यतेल वसई-विरार परिसरामध्ये वेफर्स, फरसाण बनवणाऱ्या उद्योजकांना विकले जात होते. त्यामुळे आपण खात असलेल्या वेफर्स-फरसाणसाठी भेसळयुक्त तेल वापरले जात असल्याची शक्यता देखील मनसेने केलेल्या या भांडाफोडीमधून समोर आली आहे. हा भयानक प्रकार असून या कंपनीत तेल पॅकिंग होते. पण येथील एकाच मशीनमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे पामतेल, सनफ्लॉवर तेल आणि झिरो कोलेस्टेरॉल तेल पॅक केले जात आहे. अशा लोकांवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अविनाश जाधव यांनी यावेळी केली.