ईडी, सीबीआयला बंगालप्रमाणेच महाराष्ट्रही पुरून उरेल : ममता बॅनर्जी


मुंबई – ईडी आणि सीबीआयला जसा पश्चिम बंगाल पुरून उरला, तसाच महाराष्ट्रही पुरून उरेल, असा विश्वास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. काल ममता बॅनर्जी यांची राऊत यांनी शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह भेट घेतली. राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना या भेटीबाबत माहिती दिली.

या भेटीबाबत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपचे प्रमुख कार्यकर्ते म्हणजे, ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स, एनसीबी हे ज्या पद्धतीने जे दहशतवाद निर्माण करत आहेत. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारचे महान कार्य हे भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्येही करत आहेत, असे मी कालच्या भेटीत दीदींना सांगितले. दीदी त्यावर म्हणाल्या की, त्यांना आम्ही पुरुन उरलेलो आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रही या दहशतवाद्यांशी सामना करेल अशी खात्री असल्याचेही त्या म्हणाल्या. त्यांनी जय बांगला, जय मराठा अशी घोषणा दिली. अन्यायाशी, असत्याशी ही दोन्ही राज्य एकत्रितपणे लढतील आणि विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असल्या तरी खूप मोठ्या नेत्या आहेत. ज्याप्रकारे पश्चिम बंगालमध्ये त्यांनी एका वाघीणीसारखी झुंज दिली आणि सगळ्या लांडग्यांना पळवून लावले, हे पाहता संपूर्ण देश ज्या प्रमुख लोकांकडे पाहत आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. शरद पवार आहेत, ते सतत सर्वांना एकत्र घेऊन निर्णय घेत असतात. त्यामुळे नक्कीच शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची भेट ही देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. कारण शरद पवारांच्या राजकीय उंचीच्या अनुभवा एवढा आज एकही नेता आपल्या देशात नाही. त्यांचा अनुभव आणि व्यासंग प्रचंड दांडगा असल्यामुळे ममता बॅनर्जी शरद पवारांची भेट घेत असतील, तर त्याचे आम्ही स्वागत करतो, असे संजय राऊत म्हणाले. शरद पवारांच्या मतानुसार, जर समर्थ अशी आघाडी आपल्याला उभी करायची असेल, तर आपल्याला एकत्र यावेच लागेल, असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबई दौऱ्यावर कालपासून (मंगळवार) असलेल्या ममता बॅनर्जी या आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी दुपारी 3 वाजता ही भेट होणार आहे. दरम्यान काल मुंबईत दाखल झाल्यानंतर ममता बॅनर्जींनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊतांची देखील भेट घेतली. यावेळी ममता यांनी ‘जय बांगला, जय मराठा’ असा नारा दिला.

ममतांनी ऑगस्ट महिन्यात पहिला मोठा दिल्ली दौरा आखला. त्यांनी त्यावेळी शरद पवारांची भेट टाळली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी शरद पवार संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत होते. पण त्यावेळी अरविंद केजरीवाल, कनिमोळी यांची भेट घेणाऱ्या ममतांनी पवारांची भेट घेतली नव्हती. ममता बॅनर्जींनी त्यावेळी जाणूनबुजून शरद पवारांची भेट टाळल्याचे बोलले जात होते. राजकीय चर्चांमध्ये पवारांचे नाव तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वासाठी नेहमीच चर्चेत असते. या पार्श्वभूमीवर या दोघांच्या भेटीकडे पाहिले जात आहे. मुंबईसोबतच मोदींच्या वाराणसीवरही ममता लक्ष ठेवून आहेत. लवकरच आपण वाराणसीत जाणार असल्याचे ममतांनी घोषित केले आहे. मोदींच्या वाराणसीत आपला जम बसवण्याच्या ममता यांचा प्रयत्न असणार आहे.

समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मदत करायला तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ममतांप्रमाणेच केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही विस्ताराची मोठी योजना आखत आहे. केजरीवाल गोवा, पंजाब, उत्तराखंड, गुजरात या राज्यांमध्ये विस्ताराची मोठी योजना आखत असल्यामुळे आता 2024 च्या या शर्यतीत नेमके कोण पुढे येणार आणि कोण भाजपला टक्कर देऊ शकणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.