महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्राचा आक्षेप


मुंबई : कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगाची धाकधूक वाढवली असून संपूर्ण देश नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे दहशतीखाली आहे. त्यानंतर सर्तकता बाळगण्यास प्रत्येक राज्यांनी सुरुवात केली आहे. राज्याने देखील कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानंतर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना पत्र लिहिले आहे. राज्याने 30 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सवाल उपस्थित केले आहे.

राज्य सरकारकडून आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरीता जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्राने आक्षेप घेतला आहे. ओमिक्रॉनसंदर्भात केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सूचना, सुधारित नियम लागू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या मार्गदर्शक सूचना इतर राज्याच्या मार्गदर्शक सुचनांशी साधर्म नसल्याचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

विमानतळावर डोमेस्टिक प्रवाशांकरता 72 तासांपर्यंतचा आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे. यापूर्वी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागत होते. पण मुंबई विमानतळावर आता 72 तासांपर्यंतचा कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट दाखवणे सक्तीचे आहे. रिपोर्ट नसल्यास विमानतळावर कोरोना टेस्ट केली जाणार आहे. यापूर्वीच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार, दक्षिण आफ्रिका, रिस्क देशामधून येणा-या प्रवाशांचे सात दिवस संस्थात्मक क्वारंटाईन आणि त्यानंतर 14 दिवस होम आयसोलेशन असणार आहे.

राज्य सरकारकडून 30 नोव्हेंबरला ओमिक्रॉन संदर्भात खालील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत :

मुंबई विमानतळावर आल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आरटीपीसीआर करणे बंधनकारक, कोणत्याही देशाचा असला तरी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य

आंतरराष्ट्रीय प्रवाशाच्या आरटी-पीसीआरचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला तरी देखील 14 दिवस होम क्वारंटाइन राहावे लागणार

मुंबईहून कनेक्टींग फ्लाईटकरीता देखील आरटीपीसीआर करणे बंधनकारक

महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक डॉमेस्टिक फ्लाईटमधील प्रवाशांना 48 तासाआधी आरटीपीसीआर चाचणी अहवाल सादर करणे बंधनकारक