एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी मोदी सरकारने विकली; २१० कोटींना व्यवहार ठरला


नवी दिल्ली – सरकारी मालकीच्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या विक्रीला मंगळवारी केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. आता नंदल फायनान्स अॅण्ड लिजींग या कंपनीला २१० कोटींना ही कंपनी विकण्यात येणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षामधील ही दुसरी सरकारी कंपनी आहे, जिच्या विक्रीला केंद्राने हिरवा कंदील दिला आहे. सरकारने काही आठवड्यांपूर्वीच टाटा समुहासोबत एअर इंडियाच्या विक्रीचा करार केला होता. याच आर्थिक वर्षामध्ये सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा व्यवहार पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.

सरकारने निर्गुंतवणूकीकरणाच्या माध्यमातून १.७५ लाख कोटी रुपयांचा निधी उभा करण्याचे लक्ष्य समोर ठेवे आहे. सरकारी मालकीच्या कंपन्यांची विक्री तसेच एलआयसीमधील हिस्सेदारी विकण्याचा यामध्ये सरकारचा मानस आहे. सरकारने आतापर्यंत नऊ हजार ३३० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात यश मिळवले आहे. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या व्यवहाराला आर्थिक व्यवहारांसंदर्भातील संसदीय समितीने हिरवा कंदील दिला. या समितीमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामन, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी. विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचा समावेश आहे. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील संपूर्ण हिस्सेदारी सरकारने विकण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या अंतर्गत सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी येते. १९७४ साली या कंपनीची स्थापना करण्यात आली. ही कंपनी स्थापन करण्यामागे वीज निमिर्ती संदर्भातील उपकरणे देशांतर्गत पद्धतीने निर्माण करण्याचा आणि त्यावर संशोधन करण्याचा हेतू होता. सोलार फोटोव्होल्टीक तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्यावर संशोधन करण्याचे काम या कंपनीने केल्याचे कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीमध्ये म्हटले आहे. या कंपनीमधील २०१६ सालापासून निर्गुंवणूकीकरणाची प्रक्रिया सुरु होती. इच्छूकांकडून यासाठी २०१९ साली निविदा मागवण्यात आलेल्या. पण त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे सरकारने म्हटले आहे.

पुन्हा कंपनी विक्रीची प्रक्रिया फेब्रुवारी २०२० मध्ये सुरु करण्यात आली. या कंपनीसाठी जुलैपर्यंत तीन कंपन्यानी बोली लावली. अखेर मंगळवारी हा व्यवहार पुढील टप्प्यात गेला असून कोणत्या कंपनीला ही कंपनी विकायची यावर मोदी सरकारने शिक्कामोर्बत केले आहे.