धोनीचा पगार घटला आणि जडेजाचा वाढला

यंदाच्या आयपीएल चँपियन, चेन्नई सुपर किंगने आयपीएल २०२२ साठी चार खेळाडू रिटेन केले असून त्यात महेंद्रसिंग धोनी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. मंगळवारी या चार खेळाडूंची नावे जाहीर केल्यावर टीमच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण फ्रेन्चाईजीने यावेळी जडेजावर अधिक पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे पूर्वी सर्वात महाग खेळाडूचा धोनी कडे असलेला मान रवींद्र जडेजाकडे गेला आहे. धोनीला यंदा १२ कोटी तर जडेजाला १६ कोटी रुपये पगार मिळणार आहे.

याच टीममधील युवा ओपनर ऋतुराज गायकवाड आणि विदेशी खेळाडू इंग्लंडचा मोईन अली यांना ही रीटेन केले गेले असून एकूण ८ टीमनी २७ खेळाडू रिटेन केले आहेत त्यातील ८ विदेशी खेळाडू आहेत. २७ खेळाडू रिटेन करण्यासाठी २६९.५ कोटी खर्च केले गेले असे समजते. रिटेन करताना काही खेळाडूंचे पगार कमी तर काहींचे जास्त झाले आहेत. चार खेळाडूंचे पगार कमी झाले आहेत. त्यात धोनी बरोबर विराट कोहलीचाही समावेश आहे. धोनीला गतवर्षी १५ कोटी दिले गेले त्याऐवजी आता १२ कोटी तर विराटला गतवर्षीच्या १७ कोटीऐवजी १५ कोटी मिळणार आहेत. विराट तरीही त्याच्या टीम मधला सर्वात महाग खेळाडू आहे.

यात सर्वाधिक फायदा ऋतुराज गायकवाड याला मिळाला असून त्याला गेल्या वर्षी ४० लाख मिळाले होते ते यंदा ६ कोटी रुपये मिळणार आहेत. जडेजाला गेल्यावर्षी ७ कोटी मिळाले होते ते यंदा १६ कोटी मिळणार आहेत. मोईन अलीला ८ कोटी मिळणार आहेत.