खऱ्या गब्बरसिंगला पकडणाऱ्या रुस्तमजीनी घातला होता बीएसएफचा पाया

बीएसएफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा सिमा सुरक्षा दल. आज बीएसएफचा ५६ वा वर्धापन दिवस. अनेकांना याची माहिती नसेल की शोले या गाजलेल्या चित्रपटातील डाकू गब्बरसिंग हे पात्र ज्या मध्यप्रदेशातील चंबळ मधील बीहड येथील गब्बरसिंग या नावाच्या खऱ्या दरोडेखोरावरून घेतले त्याला पकडणाऱ्या केएफ म्हणजे खुस्रो फारामर्ज रुस्तमजी यांनी बीएसएफची स्थापना करण्यात मोठे योगदान दिले होते. रुस्तमजी देशाच्या अग्रणी सीमा सुरक्षा बलाचे संस्थापक आणि पहिले डायरेक्टर जनरल होते. ते एकमेव असे पोलीस अधिकारी होते ज्यांना पद्मविभूषण हा देशातील सर्वोच्च दोन नंबरचा नागरी सन्मान दिला गेला आहे.

रुस्तमजी यांचे चरित्र म्हणजे जांबाज, साहसी व्यक्तीची कथा आहे. पोलिसात राहून सुद्धा त्यांनी त्यांचे सर्व जीवन देशाच्या सुरक्षेसाठी दिले. २२ मे १९१६ ला नागपूर मध्ये जन्मलेले रुस्तमजी स्वातंत्र्यापूर्वी १९३८ मध्ये सेन्ट्रल प्रोव्हिन्स मध्ये पोलीस अधिकारी होते. स्वातंत्र्यानंतर ते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे मुख्य सुरक्षा अधिकारी होते. तेव्हाच त्यांची मध्यप्रदेशचे पोलीस प्रमुख म्हणून नेमणूक झाली होती.

या काळात चंबळ खोऱ्यात शेकडो डाकू सक्रीय होते. या डाकूंचा बंदोबस्त करण्यासाठी रुस्तमजी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने झुंज देऊन गब्बरसिंग, लाखनसिंग, रुपा, अमृतलाल यांच्या टोळ्या नामशेष केल्या होत्या. याच गब्बरसिंग वरून शोले मधील गब्बरसिंग साकारला गेला होता. तेव्हा रुस्तमजी यांनी केंद्र सरकारला सीमा सुरक्षेसाठी विशेष वेगळे दल असले पाहिजे असा सल्ला दिला आणि त्यानुसार रुस्तमजी यांच्यावरच असे दल स्थापण्याची जबाबदारी केंद्राने सोपविली होती.

या दलातील सैनिकांची निवड करताना रुस्तमजी यांनी बुद्धी, प्रज्ञा, साहस, शौर्य असे गुण दिसलेल्यांची निवड करण्यास प्राधान्य दिले आणि १९६५ साली या दलाची स्थापना झाली. रुस्तमजी येथून निवूत्त झाले तेव्हा या दलातील सैनिकांची संख्या ६० हजारावर गेली होती. त्यानंतर रुस्तमजी यांनी राष्ट्रीय पोलीस आयोगाची रुपरेषा तयार केली आणि १९७८ ते ८३ या काळात ते या आयोगाचे सदस्य राहिले. १९९१ मध्ये त्यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविले गेले होते. मार्च २००३ मध्ये रुस्तमजी यांचे निधन झाले.