ऑस्ट्रेलिया संसद महिलांच्या लैगिक शोषणाचा अड्डा?

लोकशाही देशात त्या त्या देशाच्या संसदेला लोकशाहीचे मंदिर मानले जाते मात्र ऑस्ट्रेलियाची संसद म्हणजे महिला खासदार व अन्य प्रशासकीय महिला स्टाफच्या लैगिक शोषणाचा अड्डा बनल्याचे नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका रिपोर्ट वरून स्पष्ट झाले आहे. येथे महिला विनयभंग, रेप प्रयत्न, लैंगिक शोषण, लैंगिक छळ, अश्लील कॉमेंट्स अश्या अनेक प्रकारांना सामोऱ्या जात असल्याचे दिसून आले असून महिलांबाबत असे प्रकार घडण्याचे प्रमाण ६३ टक्के आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरीसन स्कॉट यांनी या संदर्भात चौकशी करण्यासाठी नेमल्या गेलेल्या मानवाधिकार आयोगाला  विविध संस्थांच्या १७२३ लोकांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले कि, संसदेतील ३३ टक्के महिला कर्मचारी किमान एकदा लैंगिक छळाची शिकार झाल्या आहेत, ५१ टक्के महिलावर रेपचा प्रयत्न अथवा अश्लील कॉमेंट्स होत आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारच्या माजी सल्लागारावर संसदेतच रेपचा आरोप केला गेल्यावर स्कॉट यांनी मानवाधिकार आयोगाला चौकशीचे आदेश दिले होते. या आयोगाचा अहवाल अतिशय धक्कादायक असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे.

एका पुरुष खासदाराने तर संसदेत महिलांना कीस करणे, उचलणे, स्पर्श करणे, त्यांच्यावर अश्लील कॉमेंट करणे यात काहीही चूक नाही अशी मुक्ताफळे उधळली आहेत.तर महिला खासदारांनी पुरुष कॉरिडोर मध्ये फिरतात आणि महिलांना न्याहाळणे, संसदेत दारूच्या नशेत येऊन महिलांबाबत वागताना सीमा ओलांडणे असे प्रकार सर्रास करतात असे आरोप केले आहेत. ज्या महिलांना अश्या प्रकारांना सामोरे जावे लागले, त्यापैकी ११ टक्के महिलांनी या बाबत तक्रार नोंदविली असल्याचे समजते.