भारतीय लष्कराच्या कॉम्बॅट युनिफॉर्म मध्ये बदल

अमेरिका आणि अन्य काही देशांच्या प्रमाणेच आता भारतीय सेनेच्या कॉम्बॅट युनिफॉर्म मध्ये बदल केला गेला असून नवे युनिफॉर्म डिजिटल पॅटर्नचे असतील. या नव्या युनिफॉर्मचे पहिले दर्शन १५ जानेवारीच्या आर्मी परेड डे मध्ये होणार आहे. यावर्षी प्रथमच आर्मी डे परेडच्या मार्चिंग पथकात इंडियन आर्मीच्या वेगवेगळ्या वेळी घातले गेलेले युनिफॉर्म व त्या त्या वेळची शस्त्रे घेऊन परेड होणार आहे तसेच यंदा प्रथमच गणतंत्र परेड मध्ये आर्मीची जी पथके भाग घेतील ती वेळोवेळीच्या गणवेशात दिसतील. आजपर्यंत रेजिमेंट नुसार वेगळे गणवेश असत. त्याऐवजी प्रथमच वेगवेगळे गणवेश असतील.

आर्मीच्या संचालनात एका पथक स्वातंत्र्यापूर्वीचा गणवेश आणि शश्त्रांसह असेल, एक १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचा गणवेश, एक १९७१ च्या बांग्लादेश युद्धाच्या वेळचा गणवेश, एक पथक ९० च्या दशकाच्या सुरवातीचा गणवेश तर एक सध्याच्या गणवेशात आणि एक नव्या कॉम्बॅट युनिफॉर्म मध्ये परेड मध्ये सामील होणार आहेत.

नवीन कॉम्बॅट युनिफॉर्मसाठी डिजिटल पॅटर्न आहे ज्यामुळे कॅमोफ्लेज अधिक चांगला होतो. कॅमोफ्लेज म्हणजे आसपासच्या वातावरणात सहज मिसळून जातील असे रंग. सध्याच्या गणवेशात शर्ट आत खोचून वरून बेल्ट असतो. नवीन गणवेशात बेल्ट आत व शर्ट बाहेर असा फरक असेल. यामुळे जवानांना काम करण्यात तसेच सहज हालचाली करण्यात मदत होते असे सांगितले जाते.