संपूर्ण जगावर ओमिक्रॉनने भीतीचे सावट निर्माण केले असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा देशवासियांना दिलासा


नवी दिल्ली – कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगावर भीतीचे सावट निर्माण केले असताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी देशवासियांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे. आतापर्यंत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण देशात आढळला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून त्यांनी ही माहिती राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या सत्रात बोलताना दिली. कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉन (B.1.1.529) सर्वात प्रथम दक्षिण अफ्रिकेत आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे.

राज्यसभेत बोलताना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, आपण खूप काही कोरोना संकटात शिकलो असून आज आपल्याकडे अनेक संसाधने, प्रयोगशाळा आहेत. आपण कोणत्याही परिस्थितीचा सामना करु शकतो. दरम्यान देशात आजच्या घडीला कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या कोणत्याही रुग्णाची नोंद झालेली नाही. तसेच हा नवा विषाणू देशात येऊ नये, यासाठी संभाव्य प्रत्येक काळजी घेतली जात आहे.

‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा अफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये फैलाव वेगाने वाढत असल्याने संपूर्ण जगाला चिंता सतावत आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूचा शोध दक्षिण अफ्रिकेत लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत. यामुळे दक्षिण आफ्रिकेतील विमानसेवेवर परिणाम झाला असून कडक लॉकडाऊनची भीती सतावत आहे. दक्षिण अफ्रिकेतील विमानांवर बंदी घालण्यात आल्यामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.