उद्या सुरू होणार नाहीत मुंबई, नाशिक पाठोपाठ पुण्यात देखील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा !


पुणे – १५ डिसेंबरपर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. ही माहिती परिपत्रकाद्वारे पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यभरात उद्या (१ डिसेंबर)पासून पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू होणार असल्या, तरी मुंबई, नाशिक पाठोपाठ आता पुण्यातही या वर्गांच्या शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेच्यावतीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना आज जारी करण्यात आल्या आहेत.

या संदर्भात काढण्यात आलेल्या परिपत्रकात सांगण्यात आले आहे की, १डिसेंबर २०२१ पासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु जगभरात कोरोनाचा नवा प्रकार ओमिक्रॉन आढळून आला असून व जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटला Variant Of Concern म्हणून जाहीर केले आहे. या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये, यासाठी या विषाणू विरोधी प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आदेश निर्गमित केले जात आहेत.

१५ डिसेंबर २०२१ पर्यंत पुणे महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास स्थगिती देण्यात येत असून, कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबबत १५ डिसेंबर २०२१ नंतर पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील. इयत्ता पहिली ते सातवीचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णत: बंद राहतील. पण ऑनलाईन शिक्षणास मूभा राहील. हा आदेश पुणे महापालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या पुणे कटक मंडळ व खडकी कटक मंडळ यांना देखील लागू राहणार आहे. आदेशाचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती कार्यवाहीस पात्र राहील, असेही सांगण्यात आले आहे.