संघर्ष युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांचा आरोप ; धमक्या देत आहेत अनिल परब


पुणे – एसटी कामगारांचे आंदोलन परिवहनमंत्री अनिल परब हे असंवेदनशीलपणे हाताळत असून कामगारांना ते धमक्या देत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन एसटी कामगारांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी संघर्ष युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी केली आहे.

शशांक राव पिंपरी-चिंचवडमधील वल्लभ नगर येथे सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आपण आंदोलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्यासाठी सहभागी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितल. मुंबईत आंदोलन सुरू असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

शशांक राव यावेळी म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. त्यांना विनंती केलेली आहे, की त्यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा. कामगारांची विलिनीकरणाची मागणी बरोबर आहे. अनिल परब हे फार असंवेदनशीलपणे हे आंदोलन हाताळत आहेत. धमक्या देणे, कारवाई करणे सुरू आहे. तसेच, ते पुढे म्हणाले की, ४२ कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी देखील सरकार जागं होत नसेल, तर ही चुकीची भूमिका आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

त्यांनी याचबरोबर सांगितले की, मुंबईमध्ये आंदोलन सुरू केले होते, पण पोलिसांनी तिथे ताब्यात घेतले. तेच आंदोलन हे पिंपरीत सुरू ठेवत आहे. अनिल परब यांच्याकडून निलंबन, कामावर या अन्यथा कारवाई होईल, अशा धमक्या दिल्या जात आहेत. आमचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घ्यायला हवा. १ लाख कुटुंबांचा प्रश्न आहे. तसेच, प्रवाशांना देखील एसटीची सुविधा मिळणे गरजेचे असल्याचेही शशांक राव म्हणाले आहेत.