आगामी ‘सिंघम 3’ चित्रपटाची रोहित शेट्टीने सुरु केली तयारी


बॉक्स ऑफिसवर दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. जगभरात दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सूर्यवंशी चित्रपटाने २०० कोटींहून अधिकचा गल्ला कमावला. ‘सूर्यवंशी’च्या यशानंतर आता रोहित शेट्टीने आगामी ‘सिंघम 3’ चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. त्याने नुकताच याबाबतचा खुलासा केला आहे.

याबाबत बॉलिवूड लाईफ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टीने सूर्यवंशी चित्रपटानंतर सिंघम 3 या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. अजय देवगणच्या सिंघम 3 मध्ये अक्षय कुमार आणि रणवीर सिंग हे दोघे झळकणार का? असा प्रश्न रोहित शेट्टीला विचारला. तो त्यावेळी म्हणाला, आताच याबाबत काहीही बोलणे फार घाईचे होईल. चित्रपटात त्या दोघांच्या एंट्रीबद्दल मी अजून काहीही ठरवलेले नाही. हा चित्रपट बनून दोन वर्षे झाली आहेत, पण तोपर्यंत अनेक गोष्टी बदलू शकतात, असे रोहित शेट्टीने सांगितले.

रोहित शेट्टी पुढे म्हणाला की, अक्षय कुमारने साकारलेल्या ‘वीर सूर्यवंशी’ आणि रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’ या पात्राचे प्रचंड कौतुक केले जात आहे. पण सिंघम 3 या चित्रपटात हे तिघे जण असतील की नाही याबाबत मी कोणतीही योजना केलेली नसल्याचेही त्याने म्हटले. या चित्रपटातील कथा कशी सुरु होणार आहे, कशी संपणार आहे, याबाबत मला काहीही माहिती नाही. हे कथानक लिहिणे कठीण आहे. तुम्ही जर सिम्बा बघितला असेल तर अक्षय कुमारची एंट्री ठराविक वेळी झाली होती. त्यानंतर जर तुम्ही सूर्यवंशी पाहिला तर आम्ही ती कथा एका अशा वळणावर सोडली आहे जिथून सिंघम त्याला पुढे नेईल. त्यामुळे जोपर्यंत आम्ही त्या कथेचा ते शेवट लिहित नाही, तोपर्यंत आपण तिथे पोहोचू शकत नसल्याचे रोहितने सांगितले.