अजित पवारांसोबतच्या शपथविधीचा पश्चात्ताप होत असल्याच्या फडणवीसांच्या विधानावरुन नवाब मलिकांनी लगावला खोचक टोला


पुणे – राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी अजित पवारांसोबत केलेल्या शपथविधीचा आपल्याला आता पश्चात्ताप होत असल्याची कबुली दिली आहे. राज्याच्या राजकीय वातावरणात या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावरून देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. नवाब मलिक यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाचा समाचार घेताना, चिडिया चुग गई खेत, अब पछताए का होय, अशा शब्दांत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विधानावरून निशाणा साधला आहे. त्यांना सत्तेशिवाय रहाताच येत नाही. त्यांनी हे दोन वर्षांपूर्वी सिद्ध करून दाखवले आहे. ते सांगत राहिले की अजून वाटत नाही की मी मुख्यमंत्री नाही. बहुतेक दोन वर्षांनंतर खरी परिस्धिती त्यांनी स्वीकारली आहे. त्यांचा सात वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होता, ज्यात ते म्हणाले होते माझे लग्न कधीही होणार नाही, मी करणार नाही. पण ते देखील हे विसरून गेले. म्हणजे सत्तेवर येण्यासाठी ते काहीही करू शकतात, काहीही बोलू शकतात, असे नवाब मलिक म्हणाले.

आता देवेंद्र फडणवीसांचे भाजपमध्ये महत्त्व कमी होत असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली. मला दिसत आहे की आता देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व कमी होऊ लागले आहे. त्यांचे भाजपमधील अंतर्गत विरोधक असलेले विनोद तावडेंसारखे लोक मोठे होऊ लागले आहेत. त्यामुळे अंतर्गत राजकारण बदलत असल्याचे दिसत आहे. ज्यांना तिकीट नाकारण्यात आले, ते देशातील भाजपचे महासचिव झाले. दोन-तीन महत्त्वाच्या राज्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पंतप्रधानांकडे तावडेंना अॅक्सेस निर्माण झाला असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.