ममता बॅनर्जींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचे होते नियोजन, पण…


मुंबई – आजपासून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर असून. ममता बॅनर्जींचा हा दौरा राजकीय चर्चांचा विषय देखील ठरत आहे. कारण, नुकतीच पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतल्यानंतर आता, ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आहेत. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे देखील त्यांचे नियोजन होते, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांची भेट होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची बैठक होणार आहे.

याबाबत माहिती देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी, आज रात्री ८ वाजता मुंबईत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत मी देखील सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आरोग्याच्या समस्यांमुळे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांच्या दोन दिवसीय मुंबईत दौऱ्यात भेट घेणार नाहीत. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध मुद्यांवर बैठक करणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी या अगोदर सांगितल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे.

सध्या मुंबईत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देखील घ्यायची होती, पण आरोग्य समस्येमुळे भेट होत नाही. तथापि मी आणि आदित्य ठाकरे सायंकाळी साडेसात वाजता ट्रायटेंड येथे ममता बॅनर्जींना भेटणार असल्याचे संजय राऊत ट्विटद्वार म्हणाले आहेत.

एकूण तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असणार आहेत. आजपासूनच या दौऱ्याला सुरुवात झाली असून या तीन दिवसांमध्ये ममता बॅनर्जी येथील उद्योगपतींना भेटून त्यांना पुढील वर्षी एप्रिल महिन्यात होणाऱ्या बंगाल बिझनेस समिटचे निमंत्रण देणार आहेत.