ममता बॅनर्जींनी सिद्धिविनायकाच्या दर्शनाने केला मुंबई दौऱ्याचा ‘श्री गणेशा’!


मुंबई – आपल्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झालेल्या आहेत. आज आपल्या दौऱ्याची सुरूवात करण्याअगोदर त्यांनी श्री सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, जेव्हा मागच्या वेळेस मी मुंबईत आले होते, तेव्हा येथे येण्यास जमले नव्हते. त्यामुळे मी यंदा दर्शनास जाण्याचे ठरवले होते. गणपती पूजा आमच्या घरी देखील होते. मी मंदिर समितीची, पुजाऱ्यांची आणि महाराष्ट्र शासनाची आभारी आहे. मी सर्वांसाठी प्रार्थना करण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. मला अतिशय छान वाटले. एवढ्या चांगल्याप्रकारे या लोकांनी मला दर्शन घडवण्यासाठी व्यवस्था केली. मी अतिशय आनंदी आहे, जय मराठा.. जय बांगला… ”

आजपासून तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. ममता बॅनर्जींचा हा राजकीय चर्चांचा विषय देखील ठरत आहे. कारण, नुकतीच दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर आता, या मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे देखील त्यांचे नियोजन होते, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांची भेट होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची बैठक होणार आहे.