ट्विटरच्या सीईओ पदावरुन जॅक डॉर्सी पायउतार झाल्यानंतर कंगनाने अशा प्रकारे दिला निरोप


लवकरच ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून पायउतार होणार आहेत. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे कंपनीने सोमवारी जाहीर केले. यानिमित्ताने ट्विटरच्या सीईओपदी एक भारतीय व्यक्ती विराजमान होत असून सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूड सेलिब्रेटींनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावतनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंस्टाग्रामला स्टोरीच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना कंगनाने एका ट्विटचा स्क्रीनशॉट घेत “Bye chacha Jack…” असे म्हटले आहे.

मध्यंतरी कंगना आणि ट्विटरमध्येही चांगलाच वाद रंगला होता. कंगनाने पश्चिम बंगालमधील निकालानंतर केलेल्या काही आक्षेपार्ह ट्विटनंतर कंगनाचे अकाऊंट ट्विटरने बंद केले होते. ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन कंगनाकडून वारंवार केले जात असल्यामुळे कारवाई करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले होते. कंगना तेव्हापासून इन्स्टाग्राम आणि कू अॅपच्या माध्यमातून आपल्या पोस्ट शेअर करत मत मांडत आहे.

पराग अग्रवाल यांच्या नियुक्तीवर ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की आपला भारतीय बंधू ट्विटरचा नवा सीईओ झाला आहे, पराग अग्रवाल! काहीही होऊ शकते.