सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना राणावतला जीवे मारण्याची धमकी!


आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेली बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत आता एका नव्या कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जीवे मारण्याची धमकी कंगनाला देण्यात आल्याचे समोर आले आहे. कंगनाला तशी धमकी सोशल मीडियावरून देण्यात आली आहे.

सोशल मीडियावरून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि ट्विट्समुळे कायमच चर्चेत राहणाऱ्या कंगनाला आता जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे, तिने याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली असून, धमकी देणाऱ्याविरोधात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांना कंगनाने सांगितले की, तिला सोशल मीडियावरून एक व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यानंतर कंगनाने मनाली पोलीस स्टेशन गाठून तिथे धमकी देणाऱ्याविरोधात फिर्याद दिली आहे.

कुल्लूचे पोलीस अधिक्षक गुरदेव शर्मा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कंगना राणावतने मनाली पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रारपत्र दिले आहे, तिने ज्यामध्ये लिहिले की, सोशल मीडियावर एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी कलम २९५ ए, ५०४, ५०५,५०६,५०९ आयपीसी अंतर्गत प्रकरण प्रविष्ट केले आहे.

दरम्यान, कंगना राणावतच्या अडचणीत शीखांसदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरून वाढ झाली आहे. कंगनाला आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सद्भावना समितीचे अध्यक्ष राघव चड्डा यांनी समन्स पाठवले आहे. त्यामुळे ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता या प्रकरणात कंगनाला समितीसमोर हजर राहावे लागणार आहे. कंगनावर शिख समुदायाविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.